पर्यटनातून जैतापूर गावचा विकास

By Admin | Published: November 19, 2015 09:15 PM2015-11-19T21:15:09+5:302015-11-20T00:16:32+5:30

संजय यादवराव : खाडीमध्ये बॅक वॉटर टुरिझम व्यवसाय राबविण्याची योजना

Jatapura village development through tourism | पर्यटनातून जैतापूर गावचा विकास

पर्यटनातून जैतापूर गावचा विकास

googlenewsNext

जैतापूर : पर्यटनाच्या माध्यमातून जैतापूरचा विकास चांगल्या प्रकारे करता येण्यासारखा आहे. त्यातूनच येथील युवा पिढीला रोजगार मिळवून देता येईल, असे प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी जैतापूर येथील विलास मांजरेकर यांच्या घरी चर्चासत्राच्या वेळी केले.
जैतापूरच्या खाडीमध्ये बॅक वॉटर टुरिझम व्यवसाय चांगल्या प्रकारे राबवता येण्यासारखा आहे. त्या माध्यमातून जैतापूर बाजारपेठेला उर्जितावस्था आणता येईल. यावेळी त्यांनी होळी गावाची पाहणी करून त्या ठिकाणी असलेल्या बीचला भेट दिली.
होळी गावातील बीच विकसित करता येईल. तेथे रस्ते होणे प्रथम गरजेचे आहे. आंबोळगडपासून तिवरेपर्यंतचे समुद्रकिनारे कोकणातल्या पहिल्या पाच मधले आहेत. ते विकसित कसे करता येतील, याबाबत आराखडा तयार करून शासनाला पाठवण्यात येईल. वाडातिवरे हा भाग मागास असून, पर्यटकांना माहित नसलेला हा भाग आहे. त्यामुळे येथे पर्यटनाचा विकास झालेला नाही. मात्र, हा भाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जाऊ शकतो. याबाबत तपशीलवार योजना कशी आखता येईल, त्यासंदर्भात आपल्या हालचाली सुरु झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, केरळची पर्यटन आर्थिक व्यवस्था गेल्यावर्षी २८ हजार कोटी रुपये इतकी होती. कोकणाचा पायाभूत विकास केल्यास कोकणची पर्यटन आर्थिक व्यवस्था त्याहीपेक्षा अधिक वाढेल. येत्या मे महिन्यामध्ये जैतापूर खाडीमध्ये बॅकवॉटर फेस्टिव्हल आयोजित करणार असून, चित्रपट निर्माते महेश मांजरेकर, निर्माण बोल्डर्सचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, सत्यसाई एक्सपोर्टचे अध्यक्ष विलास मांजरेकर, समर्थ लँड डेव्हलपर्सचे अध्यक्ष प्रदीप डोंगरे हे या फेस्टिव्हलकरिता पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रामध्ये जैतापूरचे पद्मनाभ मांजरेकर, गिरीष करगुटकर, सचिन नारकर, राकेश दांडेकर, सुनील करगुटकर, मनोहर कांबळी, पर्शुराम डोर्लेकर, जैतापूरचे अन्य ग्रामस्थ तसेच तिवरे गावचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुरव, नवनाथ हळदणकर, अमोल सिनकर, संतोष दुधवडकर उपस्थित होते. (वार्ताहर)


बॅक वॉटर फेस्टिव्हल: विविध कार्यक्रमांची रेलचेल
जैतापूर येथे बॅक वॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलचे नियोजन करण्यात येत असून, सिने अभिनेता महेश मांजरेकर, राजेंद्र सावंत, विलास मांजरेकर, प्रदीप डोंगरे यांच्या सहकार्याने जैतापूर बॅक वॉटर फेस्टिव्हल भव्यदिव्य करण्याचा मनोदय संजय यादवराव यांनी व्यक्त केला आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वांना या फेस्टिव्हलचे वेध लागले आहेत.


रोजगाराची संधी
जैतापूर परिसराचा विकास झाल्यास येथील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा असल्याने याठिकाणी पर्यटकांना आकर्षिक करणे गरजेचे आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास रोजगाराची संधी मिळू शकते.


जैतापूरमध्ये बॅक वॉटर टुरिझम कंपनी स्थापन करणार.
जैतापूर बॅक वॉटर फेस्टिव्हल मे २०१६ मध्ये घेणार.
चर्चासत्रावेळी संजय यादवराव यांनी दिली माहिती.

Web Title: Jatapura village development through tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.