जठारांचा स्वाभिमान गहाण, दीपक केसरकरांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:17 PM2019-12-07T15:17:21+5:302019-12-07T15:20:11+5:30
मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी लगावला.
सावंतवाडी : मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी लगावला. तसेच आमदार नीतेश राणे यांनी टिष्ट्वटरवर राज्य चालते असा गैरसमज करून घेऊ नये, असे सांगत आमदार केसरकर यांनी बैलगाडीला मागे बांधलेल्या कोकरूचे उदाहरण दिले.
ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेवक बाबू कुडतरकर, प्रकाश बिद्रे, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, महिला तालुका प्रमुख दिपीका दळवी, श्रावणी सावंत आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गमधील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. फक्त नवीन सरकार आल्यावर पूर्ण सरकारच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून तसेच सध्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले गेले पाहिजे हे पाहून काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय घेतले आहे. जी कामे सुरू आहेत. ती कामे सुरू रहातील पण काही कामे अद्याप सुरू नाहीत.
तसेच ज्याच्या निविदा काढल्या पण काम सुरू करण्याचे आदेश झाले नाहीत, अशीच कामे थांबवण्यात आली असून, ती रद्द केली नसून काही दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आहेत. असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. कोकणातील मंदिरांची कामे रद्द केली त्यावर नीतेश राणे यांनी ट््िवट केले होते. त्यावरही केसरकर यांनी जोरदार टीका केली.
काही जणांना वाटते की बैलगाडी जी चालली आहे. ती मागे बांधलेल्या कोकरूमुळेच चालते पण तो भ्रम असतो. त्यामुळे कोणाच्या ट्विटमुळे राज्यात निर्णय होत नसल्याचा टोलाही केसरकर यांनी राणे यांना लगावला.
यावेळी जठार यांनी केलेल्या टीकेलाही केसरकर यांनी उत्तर दिले.
जठार यांच्यावर बोलणे मला मुळात आवडतच नाही. पण त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकचे नाव पण घेऊ नये, जी भाजप मराठी माणसाचा पक्ष संपवायला निघाली होती. विधानसभा निवडणुकीत ४० ते ४२ अतिरिक्त उमेदवार उभे करून ते निवडून आणायचे असा त्याचा हट्टाहास होता आणि नंतर शिवसेनेला दुय्यम स्थान द्यायचे यामुळे शिवसेनेच्या वाघाला असा निर्णय घ्यावा लागला. मात्र जठार यांनी नितिमत्तेच्या गोष्टी करू नये त्यांनी आपला स्वाभिमान सध्या राणेंच्या पायाशी गहाण ठेवला आहे, असेही केसरकर म्हणाले.
सेनेचाच उमेदवार
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत कोणताही निर्णय घेताना आम्ही महाविकास आघाडीला विश्वासात घेणार आहोत. मात्र, ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने ज्याच्या ताब्यात जी जागा असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाते. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत शिवसेनाच आपला उमेदवार उभा करेल, असेही केसरकर यांनी जाहीर केले.