रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून उदय सामंत यांना जठार यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:21 PM2020-07-27T15:21:18+5:302020-07-27T15:25:06+5:30
जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
कणकवली : जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून लगावला आहे.
रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे असे वक्तव्य राज्यमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. जनतेच्या इच्छा, आकांक्षांचे मालक नव्हे. असा टोला त्यांनी जठार यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनानंतरची बेरोजगारीची स्थिती भयानक आहे. युवावर्गावर तुमच्या या विचारांचे सावट पाडू नका. कोकणच्या अनेक पिढ्या रोजगारासाठी मोठ्या शहरात विस्थापित झाल्या होत्या. आता कोकणात परतणाऱ्या नव्या पिढ्या तुमचे काळ्या दगडावरचे नकार स्वीकारायच्या मन:स्थितीत नाहीत.
तुमच्या सफेद रेषांसह काळे नि दुर्दैवाने कोकणातून निवडून आलेले हे खासदार, आमदारांसारखे काळे दगड आता कोकणच्या समुद्राच्या तळाशी कायमकरता फेकले जातील हे लक्षात घ्यावे. नाणार प्रकल्प हा कोकणचा आर्थिक कायापालट करून टाकण्याची क्षमता असलेला प्रकल्प आहे.
दीड ते दोन लाख लोकांना रोजगार देण्याची ताकद आणि रोजगाराच्या अप्रत्यक्ष लाखो संधी देणारा हा प्रकल्प आहे. कोकणी जनतेचे प्रतिनिधी म्हणून या प्रकल्पात जास्तीच जास्त स्थानिक जनतेला संधी मिळण्यासाठी इथले शिवसेना आमदार आणि खासदार आक्रमकपणे उभे राहिले असते तर ते कौतुक करण्यासारखे होते. पण अशी संधी देणारा प्रकल्प नाकारणारे मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या नशिबाचे भोग आहेत. इथल्या बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी या सत्ताधारी मंडळींनी आजवर काय केले?
शेकडो कामांची कंत्राटे स्वकियांच्या नावावर घेत गडगंज संपत्ती कमवायची आणि बेरोजगार वर्गाला संधी देणारे प्रकल्प नाकारत भीकेला लावायचे. हे यांचे उद्योग आता जनता अजिबात सहन करणार नाही.
यासाठी प्रसंगी जनतेला रस्त्यावर उतरण्यासाठी आपण नक्कीच सामर्थ्य देऊ. अजूनही केंद्र सरकारचा नाणार प्रश्नासाठीचा दोन महिन्यांचा अल्टीमेटम आहे. स्थानिक जनता विनयपूर्वक हा प्रकल्प इथेच व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालत आहे. स्वत:च्या जमिनी स्वेच्छेने प्रकल्पासाठी देत आहेत, याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
स्वहितासाठी जनतेचा बळी द्याल, तर ती इंगा दाखविल
स्वहितासाठी जनतेच्या हिताचा बळी द्याल, तर कोकणी जनतेचा इंगा काय असतो हे ती दाखविल्याशिवाय राहणार नाही. तुमचा नकार असाच कायम राहिला तर हा प्रकल्प राजापूर येथे झालाच पाहिजे यासाठी लवकरच कोकणी जनता महा-जनआंदोलन उभे करील.
तसेच हे सरकार कोकणच्या समुद्रात बुडविल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हांला रिफायनरी नको तर आम्हांला शिवसेना नको ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असे उदय सामंत यांनी समजावे, असेही प्रमोद जठार यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.