शिवापुरातील जवानाचा जम्मू काश्मीरमध्ये मृत्यू
By admin | Published: March 13, 2017 11:30 PM2017-03-13T23:30:49+5:302017-03-13T23:30:49+5:30
शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार
शिवापूर (ता. कुडाळ) : सीमेवर देशसेवा बजावताना कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील वीर जवान हरी गोपाळ पाटकर (४५) यांची अचानक आठवड्यापूर्वी प्रकृती खालावली. त्यातच त्यांचे रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील सांबा-उद्यमपूर येथील कमांडर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. पाटकर यांच्या निधनाने माणगाव पंचक्रोशीवर दु:खाचे सावट पसरले असून, मंगळवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवापूर येथील पाटकर कुटुंबातील शशिकांत व हरी पाटकर असे दोघेजण सैन्यात भरती झाले होते. हरी पाटकर हे १९९४ साली उत्तरप्रदेश रायबरेलीमधून सैन्यात भरती झाले होते. गेली २३ वर्षे ते देशसेवा करीत होते. अनेक युध्दात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यात मणिपूर, अरूणाचल येथील नागा अतिरेकी असो किंवा काश्मीरमधील पुंछ सेक्टर, लडाख या ठिकाणी ते कार्यरत होते. त्यावेळी युध्दाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर ते जम्मू-काश्मीर येथील सांबा या ठिकाणी अद्यापपर्यंत हवालदार या पदावर कार्यरत होते. मात्र, गेले काही दिवसांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता. अधूनमधून त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. त्यातच रविवारी ५ मार्चला त्यांना जम्मू-काश्मीरमधील कमांडर सैनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत होते. ाण वीर जवान हरी पाटकर हे उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. त्यातच रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना पक्षघाताचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची माहिती सैनिक प्रशासनाने पाटकर यांच्या कुटुंबाला तसेच जिल्हा प्रशासनाला रविवारीच दिली होती. मात्र, जम्मू काश्मीरमधून वीर जवानाचे पार्थिव येण्यास विलंब लागणार असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. मात्र, सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने हरी पाटकर यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. जवान हरी पाटकर यांचे शिक्षण जयप्रकाश विद्यालय वाडोस येथे झाले होते. त्यानंतर २३ वर्षांपूर्वी ते सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, वीर जवान हरी पाटकर यांचे पार्थिव सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीर येथून विशेष विमानाने दिल्ली येथे येणार आहे. सायंकाळी पार्थिव गोव्यात दाखल होणार आहे. तर मंगळवारी सकाळी वीर जवान हरी पाटकर यांच्यावर शिवापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ५ जानेवारीला जत्रेनिमित्त शेवटची भेट जवान हरी पाटकर हे दोन महिन्यांपूर्वीच शिवापूर येथील जत्रोत्सवानिमित्त गावात आले होते. त्यावेळी त्यांनी गावातील प्रत्येकाच्या भेटी घेतल्या होत्या. तसेच पुन्हा लवकरच येईन, असे आपल्या कुटुंबाला सांगून गेले होते. मात्र, पाटकर यांचे अचानक निधन झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. भाऊ, मुलाची ठरली अखेरची भेट वीर जवान हरी पाटकर हे अत्यवस्थ असल्याची माहिती सैनिक प्रशासनाने पाटकर कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर त्यांचा भाऊ शशिकांत पाटकर व मुलगा गोपाल पाटकर हे जम्मू-काश्मीर येथे गेले होते. त्यावेळी हरी पाटकर यांची प्रकृती अत्यवस्थच असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले होते. शशिकांत पाटकर व गोपाल पाटकर हे चार दिवसांपूर्वीच पुन्हा शिवापूर येथे आले होते. मात्र, त्यांची ही भेट अखेरची ठरली.