काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले..
By अनंत खं.जाधव | Published: August 28, 2024 04:54 PM2024-08-28T16:54:35+5:302024-08-28T16:55:09+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार
सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला नौदल जबाबदार नसून सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. कल्याण मधील जयदीप आपटे यांच्यापर्यंत नौदलाला कोणी नेऊन पोचवलं यांची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यापूर्वीच गुन्हे कसे दाखल झाले, यात काही तरी गौडबंगाल आहे असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच चौकशी समिती नेमायची असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन नाव ठरवा अशी मागणी ही पाटील यांनी केली आहे.
मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यांची पाहणी करण्यासाठी पाटील बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना तर इव्हेंट झाली असून खात्यात पैसे पोचण्यापूवीच पैसे मिळाले का विचारत सुटले आहेत. सर्वच बाजूंनी सरकारची नाचक्की झाली आहे. त्याना सर्वसामान्य जनतेचे सोयरसुतक राहिले नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत.
जबाबदारी झटकून चालणार नाही
मालवण राजकोट किल्ला परिसरात छत्रपतींचा जो पुतळा उभारला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला आहे. मात्र आता नौदलाने हा पुतळा उभारला असे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार अंग झटकण्याचा आहे. जयदीप आपटे यांच्यापर्यंत कोणी नेऊन सोडले, त्यांना मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव होता का या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जबाबदारी झटकून चालणार नाही अशी मागणी ही त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समितीत नेमा
या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे का,? असे विचारताच पाटील यांनी आजकाल निवृत्त न्यायाधीश हे चौकशी करायला दोन वर्षे लावतात त्यामुळे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समिती नेमावी असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाच तेथील फरशी निघाल्या होत्या. त्यावरूनच यात भ्रष्टाचार किती झाला हे जनतेने जाणून घ्यावे. हे सरकार इव्हेंटजीवी झाले आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.
मंत्री केसरकरांच्या आश्वासनाचे काय झाले?
मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात फक्त लोकांना आश्वासनेच दिली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रेल्वे टर्मिनसचे काय झाले ते त्यांनी सांगावे. आता जनताच त्यांना त्याची जागा दाखवून देईल.
सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार
सावंतवाडी मतदारसंघावर जरी उद्धव सेनेकडून दावा केला जात असला तरी आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीत सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार असून आमचे उमेदवार ठरले आहेत पण आताच घोषणा करणार नाही असे म्हणत अर्चना घारे-परब याच्याकडे अंगुली निर्देश केले.