जेबिसा इजेता--मातेचे स्वप्न सत्यात उतरवले

By admin | Published: September 13, 2015 09:35 PM2015-09-13T21:35:36+5:302015-09-13T22:17:05+5:30

सर्व आफ्रिकन देशात या विषयावर समन्वय निर्माण केला. या कार्याबद्दल त्यांना २00९मध्ये वर्ल्ड फूड प्राईज देण्यात आले

Jebisa Ejeta - The dream of Mother's trueity | जेबिसा इजेता--मातेचे स्वप्न सत्यात उतरवले

जेबिसा इजेता--मातेचे स्वप्न सत्यात उतरवले

Next

समोर अनेक संधी असतानाही आपण जे सहन केले, पाहिले ते आपल्या बांधवाना सहन करावे लागू नये, यासाठी अशा संधी नाकारून देशबांधवांच्या आणि राष्ट्राच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणारी अपवादात्मक उदाहरणे आहेत. दारिद्र्य, भूक आणि हालअपेष्टांचं ओझ सांभाळतानाही माझं बाळ शिकलं पाहिजे, हे स्वप्न पाहणाऱ्या मातेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शास्त्रज्ञ जेबिसा इजेता!जेबिसा इजेता यांचा जन्म १९५0मध्ये पश्चिम मध्य इथिओपिया या आफ्रिकन देशातील वोलकोमी या गावी झाला. त्यांच्या आईचा शिक्षणावर फार विश्वास होता. शिक्षणातूनच गरिबी दूर होईल, असा विश्वास बाळगणाऱ्या इजेता यांच्या मातेने स्थानिक शिक्षकांच्या सहाय्याने इजेता यांच्या मनात शिक्षणाबद्दल प्रेम आणि ओढ निर्माण केली. प्राथमिक शिक्षण संपताच शेजारच्या शहरात जेबिसा यांचे शिक्षण सुरू झाले. रविवारी दुपारी या शहरात चालत जायचे आणि शुक्रवारी परत गावी यायचे. अशा पद्धतीने त्यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनातील त्यांच्या यशामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ओक्लहोमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या जिम्मा अ‍ॅग्रिकल्चरल अँड टेक्निकल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेला अमेरिकेतून अर्थसहाय्य मिळत असे. विशेष प्राविण्यासह वनस्पतीशास्त्र विषयात पदवी संपादन केल्यानंतर इजेता यांनी अल्मेया महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर १९७३ मध्ये डॉ. जॉन अँटेल यांच्याशी इजेता यांची भेट झाली. डॉ. जॉन यांचे ज्वारी या पिकावरील संशोधन मोठे होते. त्यांनी इजेता यांना पर्ड्यू विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी येण्याबाबत सूचवले. तसेच इथिओपियात पिकणारे ज्वारीच्या सर्व जातीचे नमूने गोळा करण्यास सांगितले. मात्र, त्याच काळात इथिओपियात प्रचंड राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यामुळे इजेता यांना २५ वर्षे त्यांच्या मूळ गावीही जाता आले नाही. पर्ड्यू विद्यापीठातून त्यानी एम. एस. आणि पीएच. डी. या पदव्या जनूकशास्त्र आणि वनस्पती संकर या विषयात प्राप्त केल्या. त्यानंतर ज्वारी व मका यांचे संशोधन करण्यासाठी निर्माण केलेल्या इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमीएरीड ट्रॉपिक्स या संस्थेत सुदानमध्ये नोकरी स्वीकारली. या संस्थेत कार्य करत असताना कमी पावसावर, भरपूर उत्पादन देणारे ज्वारीचे पहिले संकरीत वाण तयार केले. ज्वारी हे तसे आफ्रिकेतील प्रमुख अन्न असल्याने त्यांनी याच पिकावर लक्ष केंद्रित केले. या नव्या वाणामुळे ज्वारीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आणि आफ्रिकन जनतेला अन्नटंचाईपासून दिलासा मिळाला. त्यातील डुरा-१ हा वाण आफ्रिकेतील बहुतांश देशात पिकवला जाऊ लागला.
मात्र, ज्वारीच्या उत्पादनात आणखी एक मोठी अडचण होती. टारफुला म्हणून भारतात ओळखली जाणारी परजिवी तणाची जात ज्वारीच्या मुळावर उठली होती. हे परोपजिवी तण ज्वारीच्या मुळावर छान रूजते. ज्वारीच्या पिकाकडून अन्न आणि पाणी घेते, तण जोमात वाढते आणि पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. नायजेरियन वातावरणात वाढणारे एनडीए - हे संकरित वाण खूप उत्पादन देत होते. मात्र, टारफुलामुळे ज्वारीची रोपे जळत होती. मोठी हानी होत होती. रॉकफेलर फाऊंडेशनने दिलेल्या अर्थसहाय्याच्या बळावर इजेता यांनी याही आव्हानाला यशस्वीपणे तोंड दिले. जनूकीय संकर प्रक्रियेव्दारा टारफुलाला मुळावर वाढू न देणारे कमी पावसात वाढणारे आणि भरघोस उत्पादन देणारे ज्वारीचे नवीन वाण शोधून काढले आणि आफ्रिकन शेतकऱ्याच्या शेतीतील दुखाचे कारण नाहीसे केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ज्वारीच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली. त्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत वर्ल्ड व्हिजन-२000 तयार केले. सर्व आफ्रिकन देशात या विषयावर समन्वय निर्माण केला. या कार्याबद्दल त्यांना २00९मध्ये वर्ल्ड फूड प्राईज देण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत इथिओपिया सरकारने नॅशनल हिरो वार्ड देऊन त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान गौरव केला. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले आहे. विविध पारितोषिकांच्या रकमांमधून त्यांनी आफ्रिका आणि इथिओपियातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत देणारी संस्था निर्माण केली आणि आईचे संस्कार आजन्म जपल्याचे सिद्ध केले.
- डॉ. व्ही. एन शिंदे
उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Web Title: Jebisa Ejeta - The dream of Mother's trueity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.