तेरेखोल नदीत आढळला ‘जेलीफिश’
By admin | Published: January 15, 2017 11:20 PM2017-01-15T23:20:15+5:302017-01-15T23:20:15+5:30
सागरी संशोधकांना अभ्यासाची संधी : समुद्रातील मासा गोड्या पाण्यात सापडल्याने आश्चर्य
नीलेश मोरजकर ल्ल बांदा
खोल समुद्रात वास्तव्य असणारा व विषारी म्हणून ओळख असलेला ‘जेलीफिश’ हा मासा आरोसबाग येथील तेरेखोल नदीपात्रातील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गतवर्षी समुद्रातच सापडणारा ‘स्टिंग रे’(वागळी) हा मासाही आरोसबाग येथील नदीपात्रात आढळला होता. खोल समुुद्रात सापडणारा हा जलचर नदीत सापडल्याने येथील गोड्या पाण्यातील जैवविविधतेत जेलीफिश माशाची आता भर पडली आहे. सागरी पाण्यात दुर्मीळ प्रजातीचा शोध घेणाऱ्या सागरी संशोधकांना यामुुळे जेलीफिश माशाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र हा विषारी मासा असल्याने नदीपात्रातील मानवी वावरावर याचा परिणाम होणार आहे.
जागतिक पातळीवर जेलीफिश हा मासा सागरी संशोधकांसाठी नेहमीच आकर्षण राहिला आहे. तेरेखोल नदीपात्रात तो सापडल्याने आता ही नदी सागरी जैवविविधतेच्या जागतिक नकाशावर येणार आहे. यामुळे या तेरेखोल नदीचे महत्त्व हे जागतिक पातळीवर वाढणार आहे. तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्याही मोठ्या प्रमाणात असून, या मगरींचा जेलीफिश माशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या माशाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. जेलीफिश मासा हा तेरेखोल नदीपात्रात प्रथमच सापडला आहे. एवढ्या कमी पाण्यात हा मासा सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. तेरेखोल नदीपात्रातील पाण्यात जेलीफिश मासा हा मोठ्या संख्येने आहे. यावर्षीच हा मासा येथे पहायला मिळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तेरेखोल नदी गोवा हद्दीत अरबी समुद्राला जाऊन मिळते. समुद्राच्या भरतीचे पाणी आरोसबाग-शेर्लेपर्यंत नेहमी येते. यामुळे भरतीच्या वेळी या नदीपात्रातील पाणी नेहमीच खारे असते.
अरबी समुद्रातून वाहत येऊन हा जेलीफिश मासा तेरेखोल नदीपात्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या माशाचा वावर हा खोल समुद्रात असल्याने हजारो मैलांचा प्रवास करुन हा मासा याठिकाणी आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर्षीच नदीच्या पात्रात हा मासा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने स्थानिकांचे नदीपात्रातील वावरणे धोकादायक बनले आहे. जेलीफिश अंगावरील काट्यांनी शत्रूवर हल्ला करतो. हे काटे विषारी असल्याने माणसाच्या त्वचेवर काटे टोचल्याने लालसर फोड येऊन खाज येणारा पुरळ शरीरावर उठतो. हा त्रास काही आठवडे किंवा काही महिने सहन करावा लागतो. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या किनारपट्टीवर गणेश विसर्जनावेळी जेलीफिशने अनेकांना दंश करुन जायबंदी केल्याची घटना घडली होती.
जेलीफिश स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याच्या अंगातील ‘नेमॅटोसाइस्ट’ नावाचा एक काटेरी भाग शत्रूला टोचतो. हे काटे विषारी असतात. गतवर्षी आॅस्ट्रेलियात ४० हजार लोकांचा चावा जेलीफिशने घेतल्याने ते जायबंदी झाले आहेत. काटे टोचल्यावर आपला हात किंवा पाय हा गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र यावर कायमस्वरुपी उपाययोजना नसून त्यावर सध्या संशोधन सुरू आहे.
कोकणातील मच्छिमार बांधवांनाही मासेमारी करत असताना जेलीफिशचा त्रास होतो. मच्छिमार जेलीफिशने चावा घेतल्यास तंबाखू पाण्यात टाकून ते पाणी जखमेवर लावतात किंवा गावठी तुपाचा वापर करतात. यामुुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
प्रकाशाचे उत्सर्जन करणारा जलचर
जेलीफिश रात्रीच्यावेळी किंवा मध्यरात्री समुद्राच्या तळावर घोळक्याने जमतात. त्यांच्या चमकण्यामुळे पाण्यामध्ये विजेचा झगमगाट केल्यासारखे वाटते. जेलीफिशच्या शरीरात रासायनिक क्रीडा घडत असल्याने त्यांच्या शरीरातून प्रकाशाचे उत्सर्जन होते. त्यांच्या शरीरातील कॅल्शियम आणि स्वयंप्रकाशित प्रथिने यांची एकमेकांशी प्रक्रिया घडून स्वयंप्रकाशित प्रथिने तयार होतात. हे जेलीफिश छोटे मासे, कोळंबी, छोटे खेकडे, समुद्री कासव आणि शेवाळ खातात. त्यामुळे नदीपात्रातील मत्स्यबीजावरही याचा विपरीत परिणाम होणार आहे.