आगामी निवडणुकीत जोेमाने काम करा
By admin | Published: July 14, 2016 12:23 AM2016-07-14T00:23:19+5:302016-07-14T00:31:07+5:30
वैभव नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : बांदा येथील ‘शिवबंधन’ मेळाव्यात मार्गदर्शनं
बांदा : बाळासाहेबांच्या विचारांवर निर्माण झालेली शिवसेना आजही त्याच विचारावर यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. अखंड महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा वसा उद्धव ठाकरे यांनी घेतला असून शिवसैनिक तो नक्कीच पेलतील. कार्यकर्त्यांनी यासाठी सजग राहून कार्यरत रहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
बांदा येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवबंधन व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमात नाईक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, तालुकाप्रमुख रुपेश राउळ, संपर्क प्रमुख राजु नाईक, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, चंद्रकांत कासार, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, रश्मी माळवदे, भारती देसाई, शुभांगी प्रभुशिरोडकर, तालुका उपप्रमुख भैय्या गोवेकर, विभाग प्रमुख बाळा वाळके, हनुमंत सावंत, शहर अध्यक्ष गिरीश नाटेकर, विक्रांत नेवगी आदि उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाईक म्हणाले, जिल्हा परिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. यासाठी येत्या निवडणुकीत आपल्याला जोमाने काम करुन सत्ता परिवर्तन करायचे आहे. गृहमंत्री दिपक केसरकर यांच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणला आहे. यावर्षी आंबा, शेती नुकसाभरपाईसाठी ३७ कोटी रुपये निधी देण्यात आला. त्यातील ३३ कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. काँग्रेस राजवटीत हाच आकडा केवळ ४ कोटि रुपये होता. त्यातील ३ कोटी रुपये वाटप न केल्याने परत गेले होते.
तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना जोमाने उतरणार असूून यासाठी गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहीतीही वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत म्हणाल्या की, जिल्ह्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून येत्या निवडणुकांमध्ये देखिल शिवसेना जिल्ह्यात क्रमांक १ चा पक्ष बनणार आहे. यावेळी प्रकाश परब, राजु नाईक यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन भैय्या गोवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)