नोकरी एक्स्प्रेसने दिली बेरोजगांराना भाकरी
By admin | Published: June 12, 2015 11:33 PM2015-06-12T23:33:19+5:302015-06-13T00:16:07+5:30
सावंतवाडीत प्रतिसाद : १५० बेरोजगारांचा समावेश, नितेश राणे यांची संकल्पना
सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नोकरी एक्स्प्रेसला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये २७० युवकांनी सहभाग घेतला. त्यापैकी १५० जणांना नोकरीची नियुक्तीपत्र देण्यात आली असून, २३जण प्रतीक्षा यादीत आहेत. नोकरी एक्स्प्रेसचा शुभारंभ सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला. यावेळी युवकांनी व युवतींनी मोठ्या प्रमाणात सावंतवाडीत गर्दी केली होती. नोकरी एक्स्पे्रसचा शुभारंभ माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, युवक शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, प्रमोद कामत, प्रकाश कवठणकर, नोकरी एक्स्प्र्रेसचे व्यवस्थापक विनय यादव, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
तीन वर्षे सलग नोकरी एक्स्प्रेसचा लाभ युवक युवती घेत आली आहेत. मुंबई-पुणे याठिकाणी जाऊन नोकरी मिळविणे शक्य होत नाही. अशा मुलांना नोकरी एक्स्प्रेसची गाडी युवक युवतींच्या भागात येऊन नोकरी उपलब्ध करून देत आहे. हे केवळ राणे कुटुंबीयच करू शकतात, असे सांगून मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळा गावडे यांनी केले आहे.
यानंतर विनय यादव यांनी किती मोठ्या नोकऱ्या कोठे उपलब्ध आहेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली व या नोकरी एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. (वार्ताहर)