दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 27, 2023 03:56 PM2023-03-27T15:56:48+5:302023-03-27T15:58:12+5:30

लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा

Journalist day at the birth place of Darpankar Balshastri Jambhekar from the government system says Guardian Minister Ravindra Chavan | दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

googlenewsNext

सिंधुदुर्ग  : नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी ही वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा असा मौलीक सल्ला देतानाच पुढील वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन साजरा करावा त्यासाठी विशेष निधीची तरतूद ठेवावी, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव-२०२२ चे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष आफ्रिन करोल, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माजी आमदार राजन तेली, संजय आंग्रे, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते. 

पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या नंतर सरस्वती प्रतिमा, ग्रंथ पालखी आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, जिल्ह्यातील १२८ ग्रंथालये हे जिल्ह्याचे परमवैभव आहे. कमी मानधनात देखील आपल्या आयुष्यातील मोलाचे क्षण या वाचन चळवळीत देणाऱ्यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. लोकांच्या सहभागातून जलयुक्त शिवार हे अभियान ज्या पध्दतीने यशस्वी झाले. त्याच पध्दतीने नव्या पिढीसाठी वाचन चळवळ राबवण्यासाठी विचार आणि नियोजन व्हायला हवे. ग्रंथालयांमध्ये तरुणाई कशी येईल यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासमोर कथा-कथनाच्या स्पर्धा व्हायला हव्यात. 

कानात शिरणाऱ्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्याची ताकद कथा-कथन सादर कर्त्यांमध्ये आणि काव्य सादर कर्त्यांमध्ये आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसमोर व्हायला हवेत. वाचकांच्या मागणीनुसार पुस्तकांची उपलब्धता असायला हवी. जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रथा आणि परंपरा तयार कराव्या लागतील. सी.एस.आर फंडामधून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत अहवाल तयार करावा.

शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील जन्मगावी योग्य त्या नागरी सुविधा द्याव्यात. ६ जानेवारीला होणारा पत्रकार दिन हा शासकीय यंत्रणेतून पुढील वर्षापासून सुरु करा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद ठेवावी. तो उत्सव जिल्हावासियांनी करायला हवा. जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने जे व्हायला हवे ते एक मताने व्हायला हवे असेही पालकमंत्री चव्हाण म्हणाले. 

खासदार राऊत म्हणाले, शंभर-दीडशे वर्षे पूर्ण झालेली ग्रंथालये जिल्ह्यात आहेत. कोकणातील आजच्या मुलांचे स्पर्धा परीक्षेतील यश पाहता आपले पूर्वज किती दूरदृष्टीवादी होते हे दिसून येते. त्यांनी सुरु ठेवलेली ग्रंथालय चळवळ पुढच्या पिढीपर्यंत आपणा सर्वांना न्यायची आहे. सध्या लेखकांची संख्या वाढलेली आहे. परंतू ते मोबाईलवर लिहितात. या डीजिटल जगात लिखीत साहित्याचे महत्व आजही कमी झाले नाही.

आमदार नाईक म्हणाले, आजची नवी पिढी वर्तमानपत्रे देखील वाचत नाहीत. सातत्याने समाजमाध्यमांवर असतात. त्यासाठी त्यांना पुन्हा नव्याने वाचनालयाच्या माध्यमातून, ई-ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती चळवळीत आणले पाहिजे. ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. 

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, समाज माध्यमामुळे पुस्तक वाचनाची एकाग्रता कमी होत गेली आहे. पुस्तक वाचनातून इतरांच्या अनुभवांतून प्रगल्भता येते. सध्याच्या पिढीचा ई-बुक वाचनाकडे कल दिसतो. त्यासाठीच जिल्ह्यातील आठ ग्रंथालयांमध्ये ई-ग्रंथालय राबविण्यासाठी पालकमंत्र्यांनी आठ कोटी निधी दिला आहे. त्यामधून आवश्यक ती साधन-सामग्री निर्माण केली जाईल. युपीएससी, एमपीएससी करणाऱ्या मुलांसाठी त्याबरोबर वाचनाची आवड आणि जागृती करण्यासाठी ही ग्रंथालये उपयुक्त ठरतील. 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, इन्स्टाग्राम,युट्युबच्या सध्याच्या युगात वाचन परंपरा कमी होत आहे. ज्ञान वाढविण्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्सफर्ड ग्रंथालयामध्ये सर्व पुस्तके वाचून काढली. असे व्यक्तीमत्च दुसरे नाही. हीच वाचन संस्कृती शाळांपर्यत घेवून जाण्याचा माझा मानस आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सचिन हजारे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी सर्वांच आभार मानले

Web Title: Journalist day at the birth place of Darpankar Balshastri Jambhekar from the government system says Guardian Minister Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.