पत्रकारांचे सिंधुदुर्गनगरीत धरणे आंदोलन
By admin | Published: December 14, 2015 11:53 PM2015-12-14T23:53:03+5:302015-12-15T00:30:28+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासनाने पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाने पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरु करावी या प्रमुख मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी येथील जिल्हाधिकारी भवनासमोर धरणे आंदोलन छेडले. संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्गातून या आंदोलनास सुरुवात झाल्याने या आंदोलनाला वेगळेच महत्व प्राप्त झाले होते.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सचिव गणेश जेठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी होत एकजूट दाखविली. यावेळी अशोक करंबेळकर, नंदकिशोर महाजन, महेश सरनाईक, माधव कदम, संतोष वायंगणकर, विद्याधर केनवडेकर, बंड्या जोशी, चंद्रकांत सामंत, देवयानी वरसकर, दत्तात्रय मांगले, महेश रावराणे, राजेश मोंडकर, शिवप्रसाद देसाई, संदीप देसाई, विजय पालकर, अभिमन्यू लोंढे तर लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे, अमित सामंत, सुनिल भोगटे, प्रसाद शिरसाट, युवक काँग्रेसचे संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच निसार शेख, समजिवी मच्छिमार संघटना, अंध अपंग संघटना, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, काँग्रेसचे नासीर काझी, माजी आमदार परशुराम उपरकर, सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, अबिद नाईक आदींनी उपस्थिती दाखवत आंदोलनाला जाहिर पाठिंबा दर्शविला.पत्रकारांना पेन्शन मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह पत्रकारांना संरक्षण कायदा, पत्रकार भवन व गृहनिर्माण सोसायटी या मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी भवनासमोर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सुमारे १५० पत्रकारांनी धरणे आंदोलन छेडले. पत्रकार हा समाजजीवनाचा गाभा असतो. निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत नाही. त्यामुळे उतारवयात पत्रकारांना आर्थिक चणचण सोसावी लागते. म्हणून पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळावे ही गरज आहे व शासनाने त्यादृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामध्ये केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना याचा लाभ न देता सलग २० वर्षे पत्रकारितेत काढलेल्या सर्व पत्रकारांना याचा लाभ मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे वृत्तपत्राचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे जिल्ह्यात ओरोस येथे होणाऱ्या पत्रकार भवनाचे काम मार्गी लागावे तसेच पत्रकार संरक्षण कायदा अंमलात यावा अशी भावना रणजित देसाई, राष्ट्रवादीचे अमित सामंत, संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केली. धरणे आंदोलनानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)
सर्व स्तरातून पाठिंबा
४पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून वृत्तांकन करत असतात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा खासगी व्यवसायातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्तीपर पेन्शन मिळते. मात्र पत्रकारांना अद्याप पेन्शन योजना सुरु झालेली नाही. ती सुरु करावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पत्रकार पेन्शन या प्रमुख मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा दर्शविण्यात आला होता.