आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा
By admin | Published: February 3, 2015 09:40 PM2015-02-03T21:40:17+5:302015-02-03T23:56:37+5:30
आरोग्य दक्षता व्यवस्था या सर्वांचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी घेतला.
चौके : आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा शनिवार ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने भाविकांसाठीची रांग व्यवस्था, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, दूरध्वनी सेवा, रस्ते व्यवस्था, महनीय व्यक्तींसाठीची दोन हेलीपॅड, एसटीची वाहतूक व्यवस्था, विविध प्रशासकीय कक्षांची व्यवस्था, आरोग्य दक्षता व्यवस्था या सर्वांचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी घेतला. तसेच सर्व विभागांना यात्रा नियोजन अधिकाधिक सुव्यवस्थित करण्यासंबंधी सूचना दिल्या. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.या यात्रा नियोजन बैठकीत आंगणे कुटुंबियांनी सुचविलेल्या कामांची ई. रवींद्रन यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, प्रांताधिकारी रविंद्र बोंबले, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर, मालवण तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सभापती सीमा परुळेकर, मसुरे सरपंच गायत्री ठाकूर, मालवण पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, यात्रा व्यवस्था प्रमुख नरेश आंगणे, दिगंबर आंगणे, दत्तात्रय आंगणे, चंद्रकांत आंगणे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बाळा आंगणे, मंगेश आंगणे आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन संस्थांचे पदाधिकारी आणि सद्गुरु भक्त सेवान्यास माड्याचीवाडी व सतीश गिरप, बाळा गावडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसरातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून मंगेश आंगणे यांनी मसदे ते महान या मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्यासंबंधी विचारणा केली असता दोन दिवसांत ते बुजविण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)
आरोग्य विभाग सतर्क
आरोग्य विभागाचे कर्मचारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजल्यापासून ८ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत यात्रेत सेवा देणार आहेत. तसेच यावर्षी प्रथमच मालवण व कणकवली या दोन्ही एस. टी. स्टँडकडे सर्व आरोग्य सुविधा व डॉक्टर्सच्या पथकाने सज्ज अशा दोन ‘१०८’ अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात येणार आहेत. तसेच मसुरे प्राथमिक आरोग्यकेंद्राची रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाकडून पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असून ४५० बॉटल लिक्विड क्लोरीनचे मसुरे आरोग्यकेंद्राकडे पोहोच करण्यात आल्या आहेत. यात्रा परिसरातील १५० पाणी नमुने तपासले असून ते योग्य क्लोरीनेटेड आहेत तसेच ग्रामस्थांच्या मागणीवरून यात्रा संपल्यानंतरही काही दिवस पाण्याचे क्लोरीनेशन करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता झाल्यावर फॉगींगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे महत्त्व व स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत आहे. जत्रोत्सवात पाणीपुरवठा हा महत्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, सर्व प्रशासकीय यंत्रणा, आंगणेवाडी कुटुंबिय तसेच आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांनी केलेल्या जत्रोत्सवाच्या नियोजन आणि व्यवस्थेची ख्याती पसरलेली आहे. तिला गालबोट लागू न देता सर्वांच्या सहकार्याने, खेळीमेळीच्या वातावरणात जत्रोत्सव साजरा करूया
- नरेश आंगणे,
यात्रा व्यवस्थाप्रमुख, आंगणेवाडी