‘मानव विकास’चा प्रवास खडतर

By admin | Published: September 1, 2014 09:42 PM2014-09-01T21:42:59+5:302014-09-01T23:58:04+5:30

कारभाराचा फटका : एस.टी. विभागात नियोजनाचा अभाव

The journey of 'Human development' is difficult | ‘मानव विकास’चा प्रवास खडतर

‘मानव विकास’चा प्रवास खडतर

Next

प्रकाश काळे- वैभववाडी -डोंगराळ तालुक्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाने राबविलेल्या ‘मानव विकास’ कार्यक्रमात सिंधुदुर्गातून वैभववाडी तालुक्याला संधी लाभली. मात्र मानव विकास योजनेंतर्गत विद्यार्थीनींच्या मोफत एस. टी. सेवेचा ‘प्रवास’ खडतर झाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात अनेक बैठका, उपोषणे, आंदोलने झाली. परंतु मानव विकासच्या एस. टी. सेवेत काडीमात्र सुधारणा झालेली नाही. त्यामुळे बहुदा एस. टी. च्या ‘कारभारा’तून नियोजन हा शब्द ‘बहिष्कृत’ केला गेला असल्याची जाणीव गेल्या काही महिन्यांपासून होऊ लागली आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत योजनांचे नियोजन तालुका समिती आणि जिल्हा समिती असे द्विस्तरीय पद्धतीने केले जाते. या समित्यांची प्रमुखपदे जिल्हाधिकारी व गटविकास आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना नियोजनात भाग घेताना मर्यादा येत आहेत. तर दोन्ही समित्यांच्या प्रमुखांमध्ये या कार्यक्रमाबाबत समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थीनींच्या मोफत प्रवासासाठी शासनाने ५ स्वतंत्र बस देऊनही महामंडळाच्या नियोजनाअभावी मानव विकासच्या एस. टी. सेवेचा अक्षरश: खेळखंडोबा झाला आहे.
तालुक्यातील केवळ विद्यार्थीनींच्या मोफत प्रवासाच्या सोयीसाठी ३ वर्षांपूर्वी शासनाने पाच नव्या कोऱ्या बस खरेदी करून परिवहन महामंडळाच्या ताब्यात दिल्या. परंतु तालुक्यात महामंडळाचे आगार किंबहुना सुसज्ज बसस्थानक नसल्याने वैभववाडीच्या बसेसचा ताबा कणकवली आगाराकडे गेला. त्यामुळे मानव विकास योजनेच्या मोफत प्रवास योजनेचा हेतू बासनात गुंडाळून ठेवत कणकवली आगाराने मानव विकासच्या नव्या गाड्यांचा उपयोग स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी कसा करून घेता येईल याचीच अधिक काळजी घेतल्याचे दिसून येते.
वैभववाडी तालुक्यासाठी असलेल्या या सेवेचे नियोजन स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून करणे अपेक्षित असताना उपलब्ध यंत्रणेद्वारे कणकवलीतून केले जात आहे. मानव विकासच्या एस. टी. सेवेसंदर्भात पंचायत समितीच्या अनेक मासिक सभा गाजल्या, खास सभा झाल्या, विद्यार्थ्यांची आंदोलने झाली. अनेकांची उपोषणे झाली. मात्र एस. टी. च्या कारभारात तीळमात्र सुधारणा दिसून आलेली नाही. उलट प्रत्येकवेळी वेगळा चेहरा समोर आणून टोलवाटोलवी तर कधी सारवासारव करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न एस. टी. प्रशासनाने केला आहे. मानव विकास अंतर्गत एस. टी. सेवेच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने सभापतींनी तातडीने ही सेवा थांबविण्याचा ठराव अध्यक्षपदावरून मासिक सभेत केला होता. मात्र त्यानंतरही एस. टी. कडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही.
मानव विकासची एस. टी. सेवा सुरु झाल्यापासून तीन वर्षात विद्यार्थी किंवा पालकांची तक्रार नाही असा एकही महिना गेला नसेल. लोकप्रतिनिधींनी तालुका समिती प्रमुखांसह एस. टी. च्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी झापले. परंतु मानव विकासच्या एस. टी. सेवेत सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे एस. टी. महामंडळाने नियोजन या
शब्दावर बहिष्कार टाकून त्यापासून फारकत घेतली असल्याची
जाणीव होऊ लागली आहे.
त्यामुळेच मानव विकासचा एस. टी. प्रवास दिवसेंदिवस खडतर होताना दिसत आहे.

एस.टी. सेवा नक्की कोणासाठी?
शाळा, महाविद्यालयांच्या प्रमुखांनी बसफेऱ्यांच्या वेळा आणि मार्गाचे नियोजन अनेकदा एस. टी. चे अधिकारी व मानव विकास योजनेच्या तालुका समितीला दिले. तरीही काही गावातील विद्यार्थीनींना पहाटे उठून एस. टी. साठी पायपीट करावी लागत आहे. दिगशी गाव हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे. मुळात मोफत प्रवास ही केवळ विद्यार्थीनींसाठीच सेवा असून त्यांच्यासाठीच मानव विकासच्या ५ बस तालुक्यासाठी आहेत. मात्र त्याचे नियोजन योग्य रितीने होत नसल्याने चेंगराचेंगरी, छेडछाडीसारख्या घटनांना विद्यार्थीनींना सामोरे जावे लागत आहे. बऱ्याचवेळा मानव विकासच्या गाड्यांना फलक नसल्याने विद्यार्थीनींना ढकलून विद्यार्थी व इतर प्रवासी या गाड्यांमधील आसनावर ताबा मिळवत असल्याने अनेक विद्यार्थीनी एकतर उभ्याने प्रवास करतात किंवा विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांच्या गर्दीमुळे बस सोडून देऊन पुढच्या फेरीची २ ते ३ तास प्रतिक्षा करताना दिसून येतात. त्यामुळे मानव विकासची एस. टी. सेवा नक्की कोणासाठी असा प्रश्न पडतो.

Web Title: The journey of 'Human development' is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.