फणसाचा टेम्पो उलटून नांदगावातील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:49 PM2018-06-24T22:49:23+5:302018-06-24T22:49:42+5:30
पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर शनिवारी रात्री ११.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-बिडयेवाडी (कणकवली) येथून आयशर टेम्पो (एमएच-०७-एक्स-१७९०) घेऊन चालक अनिकेत लक्ष्मण बिडये रात्री ८ च्या दरम्यान भिवंडी - मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. पाली येथे आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी पाली-निवळी बावनदी या रस्त्याने हा टेम्पो जात होता. रात्री ११.४५ च्या दरम्यान निवळी-शेल्टेवाडी येथे रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. त्यामुळे उतारावरील अवघड वळणावर चालकाने ब्रेक मारला असता टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटला. यामध्ये टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये बसलेले देवेंद्र आत्माराम बिडये (४५) व जयवंत कृष्णा बिडये (४१) हे जागीच ठार झाले.
या टेम्पोतून प्रवास करणारे विठ्ठल विजय बिडये, लक्ष्मण नारायण बिडये, अश्विनी लक्ष्मण बिडये, अनिकेत लक्ष्मण बिडये, राजेश बाळकृष्ण तांबे (सर्व नांदगाव, बिडयेवाडी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे व आतील फणसांचे नुकसान झाले आहे.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला
जयवंत यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी, तर देवेंद्र यांच्या पश्चात पत्नी आई, वडील व दोन मुली आहेत. दोघांच्याही घरच्या कर्त्या पुरुषांवरच काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
या दोघांचेही मृतदेह रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले होते. नांदगाव येथील नातेवाईक व मित्रपरिवार यांना शनिवारी रात्री अपघाताची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी या दोघांचेही मृतदेह नांदगाव येथे आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारनंतर नांदगावची संपूर्ण बाजारपेठ, सहा आसनी, मॅजिक रिक्षा बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
रुग्णवाहिका चालकामुळे उपचार
अपघातावेळी घटनास्थळी जोरदार पाऊस होता. अशावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांना अपघाताची माहिती मिळाली. ते एवढ्या रात्री, भरपावसात तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले. तेथून जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली.