सत्तेचा सारीपाट: आरोप-प्रत्यारोपातून निव्वळ मनोरंजन!
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 25, 2024 11:42 AM2024-04-25T11:42:34+5:302024-04-25T11:46:35+5:30
प्रत्यक्षात ते खरे, खोटे आहेत, याची शहानिशा नंतर कोण करत बसत नाहीत
-महेश सरनाईक, सिंधुदुर्ग
लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. एकीकडे उष्णतेची लाट आहे. तापमानाचा पारा चाळीशीकडे झेपावतोय आणि दुसरीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. पुढील पाच वर्षांसाठी मतदार राजाने भरभरून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यासाठी राजकीय नेतेमंडळी जी निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षांपर्यंत सुशेगाद (आरामात) राहणार आणि पुन्हा निवडणुका आल्या की जागे होणार. अशी सुरू असलेली परंपरा मोडीत काढण्यासाठी मतदारांनी चाणाक्षपणे मतदान करणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. राजकीय नेतेमंडळी वेगवेगळी आमिषे, आश्वासने आणि भूलथापा देऊन आपल्यालाच मतदान करण्यासाठी भाग पाडतात. लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याप्रमाणे मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी वाढेल आणि चांगले, सुसंस्कृत उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जातील.
निवडणूक जवळ आली की, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होताना आढळतात. प्रत्यक्षात ते खरे, खोटे आहेत, याची शहानिशा नंतर कोण करत बसत नाहीत. परंतु, आपणच कसा चांगला आहे आणि माझा प्रतिस्पर्धी कसा कलंकित आहे, हे दाखविण्याची जणू स्पर्धाच लागते. त्यातून मग उठसूठ आरोपांच्या फैरी झडताना आढळतात. राजकारण करताना उमेदवारांनी आपल्याला हे सोसावेच लागेल म्हणून जणू काही शपथ घेतलेली असते. त्यामुळे एखादा आरोप झाला तरी कोणच धुतल्या तांदळासारखा नसतो असे म्हणत ते आरोप परतावून लावताना प्रतिस्पर्ध्यावर प्रत्यारोप केले जातात.
आताची लोकसभा निवडणूक तर फारच वेगळी आहे. गतवेळी एकत्र प्रचार करणारे यावेळी एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे आपल्यासमवेत असलेल्या मित्रांची राजकीय कुंडलीच त्यांना पाठ आहे. त्यातून आरोपांच्या फैरी झडत आहेत. मतदारांना मात्र, हे आरोप - प्रत्यारोप नवे नाहीत. त्यांना राजकारण्यांची कुवत आणि काम करण्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे कोणी किती आरोप केले तरी मतदारराजाने २०२४ मध्ये कोणाच्या पारड्यात मत टाकायचे याचा फैसला आधीच केला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी किवा विरोधक उमेदवार एकमेकांवर करत असलेल्या आरोपांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जात आहे.