डॉक्टर, वकिलांप्रमाणेच शिक्षकांच्या समोर 'टीआर'चा लोगो - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
By अनंत खं.जाधव | Published: April 21, 2023 07:04 PM2023-04-21T19:04:13+5:302023-04-21T19:04:32+5:30
शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. त्यांना वटणीवर आणले जाईल
सावंतवाडी : जसे डॉक्टर, वकील, इंजिनियर आदींच्या नावाच्या बोर्डासमोर त्यांच्या पदव्या आहेत तसे आता शिक्षकांच्या नावासमोर टी. आर ही पदवी लावली जाणार आहे. तशी घोषणा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. वाढीव अनुदान टप्पा वाटपाबाबत पटसंख्येची अट कमी करण्यात येणार आहे तसा निर्णयही झाला आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार झाल्यानंतर प्रथमच ज्ञानेश्वर म्हात्रे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत असून शुक्रवारी त्यानी सावंतवाडी येथे भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्याचे सहकार्यवाह रामचंद्र घावरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुदास कुसगावकर, भरत सराफदार, रमेश जाधव, चंद्रकांत पवार ,लक्ष्मण गवस, सुमेधा नाईक, म्हापसेकर अर्चना सावंत,परब घावरे, आदि उपस्थित होते.
म्हात्रे म्हणाले, शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. ते शिक्षकांकडून विविध कामे करून घेण्यासाठी पैसे मागत आहेत. जर शिक्षकांची अशी पिळवणूक होत असेल तर त्यांना वटणीवर आणले जाईल असेही त्यांनी सुचित केले. सावंतवाडी- दोडामार्ग या दोन तालुक्यात त्यांनी शिक्षकांच्या समस्या अडचणी संदर्भात बैठका घेतल्या.यापुढे ही अशा बैठका घेऊन त्या समस्या लवकरच वरिष्ठ पातळीवर सोडवू.
आपण आपल्या आमदार निधीतून यापुढे प्रत्येक शाळेत ई लर्निंग टीव्ही संच चांगल्या दर्जाचे देणार आहोत. तसेच यापुढे गावागावात इंग्रजी माध्यमांकडे ओढा दिसत आहे.व मराठी शाळांकडे जाण्याची संख्या कमी आहे पण यासाठी मराठी माध्यमांचे इंग्रजी पुस्तकात बदल केला जाणार आहे.असेही म्हात्रे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील थकीत 400 बिलांचे अनुदान आपण पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून उपलब्ध करून आणून दिल्याचे सांगत यापुढे आता निवड श्रेणी पध्दत असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.