आंदोलनाचे हत्यार उपसताच मिळाला न्याय
By admin | Published: November 18, 2015 11:19 PM2015-11-18T23:19:13+5:302015-11-19T00:46:55+5:30
बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली : प्रशासनासह ठेकेदाराला भाजपचा ‘दे धक्का’
सावंतवाडी : दूरसंचार विभागातील डाटा एन्ट्री कामगारांना ठेकेदारांनी कायद्यानुसार वेतन देण्यास नकार दिल्याने ठेकेदारांच्या विरोधात कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी ठेकेदाराने कामावरून कमी करण्याची धमकी दिली व दोन कामगारांना कामावरून कमीही केले. तर या आंदोलनाची चाहुल लागताच भाजप कार्यकर्त्यांनीही जिल्हा प्रबंधक एस. बिराजदार यांना घेराव घातला. यावर बिरादार यांनी दहा दिवसात उर्वरित वेतन व कमी केलेल्या कामगारांना पुन्हा रूजू करून घेऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
दूरसंचार विभागाच्या सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड, कणकवली, कुडाळ याठिकाणी डाटा एन्ट्री व सिक्युरिटी कामगार पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. पूर्वी या कामगारांना ४ हजार ५०० रूपये वेतन दिले जात होते. नवीन तरतुदीनुसार या कामगारांना प्रतिदिनी ३५४ रूपयांप्रमाणे २६ दिवसांचे ९ हजार २०४ रूपये वेतन देणे आवश्यक आहे. मात्र, या ठेकेदाराने पूर्वीच्या दराप्रमाणे ४ हजार ५०० रूपये पगार देऊन कामगारांची पिळवणूक करीत आहेत. याबाबत ठेकेदाराला जाब विचारल्यामुळे ठेकेदाराने कामावरून काढून टाकण्याची धमकी देत दोघा कर्मचाऱ्यांना कामावरून काढूनही टाकले आहे. यामुळे बीएसएनएलच्या ठेकेदाराविरोधात सर्वच कंत्राटी कामगारांनी बुधवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
बुधवार सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यालयासमोर ठाण मांडत आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी ठेकेदाराने या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली. तसेच किमान कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली. पण यावेळी ठेकेदाराने या कंत्राटी कामगारांवर दबाव आणत दडपण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणाची कुणकुण लागताच भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिल्हा प्रबंधक एक बिराजदार यांनाच घेराव घालत कंत्राटी कामगारांना पाठींबा दिला. तसेच कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत बिराजदार यांना जाब विचारला. यावेळी बिराजदार यांनी जुन्या नियमानुसार वेतन काढले असल्याचे मान्य केले व शासनाच्या निर्णयानुसार जो काही फरक आहे, तो कामगारांना दिला जाईल, असे बिराजदार यांनी स्पष्ट केले. तसेच ठेकेदाराने ज्या कर्मचाऱ्याला कामावरून काढले, त्यालाही येत्या दहा दिवसात पुन्हा कामावर रूजू करण्यात येणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.
कंत्राटी कामगारांचा शासकीय नियमानुसार भविष्य निर्वाह निधी १२ टक्के कपात होणे अपेक्षीत आहे, पण त्यापेक्षा जास्तच निधी ठेकेदार कमी करीत असल्याचा पुरावा कामगारांनी दिला. तसेच अन्य शासकीय सोयीसुविधा जाणूनबुुजून डावलून अन्याय करीत असल्याचाही आरोप कंत्राटी कामगारांनी केला. त्यामुळे या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी राहणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. तसेच त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आपल्यामार्फत कायम पाठपुरावा करणार असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)