अनंत गीतेंच्या कार्यक्रमात ‘कदम’ टार्गेट

By admin | Published: May 18, 2015 10:43 PM2015-05-18T22:43:04+5:302015-05-19T00:29:25+5:30

जोरदार टीका : खेड येथे संपर्क कार्यालय सुरु

'Kadam' Target in the program of Infinite Songs | अनंत गीतेंच्या कार्यक्रमात ‘कदम’ टार्गेट

अनंत गीतेंच्या कार्यक्रमात ‘कदम’ टार्गेट

Next

खेड : एकाच पक्षात राहून हाडवैरी असलेल्या अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील वाद पु्न्हा एकदा सर्वांसमक्ष उघड झाला. गीते यांच्या खेड येथील कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी खेडचे माजी शाखाप्रमुख आणि जेष्ठ शिवसैनिक सुधा बुटाला यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अनिकेत शॉपिंग सेंटर सभागृहामध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थितांनी कदम यांना चांगलेच ‘टार्गेट’ केले. एवढेच नव्हे तर नाव न घेता आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर उघडपणे व्यक्त केल्या.एका सामान्य शिवसैनिकांच्याहस्ते आपल्या कार्यालयाचे उदघाटन केल्याबद्दल गीते धन्यवाद दिले. विकास कामांसंबंधात हे कार्यालय आता मुंबई आणि दिल्लीशी जोडल्याने या आधुनिक विकसित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण केव्हाही उपलब्ध होवू, असे ते म्हणाले. त्यानंतर गीते यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला.
मेळाव्याला मंत्री रामदास कदम, सभापती चंद्रकांत कदम आणि काही ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित नव्हते. हाच धागा पकडून त्यांनी गद्दारांना आता क्षमा नसल्याचे सांगत जे गेलेत, त्यांनी स्वत:हून परत या अन्यथा हकालपट्टी करू, असा इशाराच दिला. संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही़ ही व्यक्तीनिष्ठ संघटना नव्हे तर ही बाळासाहेबांची संघटना आहे, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडणुकीत पाडण्यामध्ये शिवसेनेतील गद्दार कारणीभूत आहेत. यामुळे अशांना आता थारा देवू नका. जे निष्ठावंत आहेत, त्यांनाच मानाचे पद द्या, असे सांगत संघटनेमधील विषय हे संघटनेच्या माध्यमातून सुटले पाहिजेत. कोणा व्यक्तीच्यामार्फत नव्हे, असा टोलाही त्यांनी रामदास कदमांचे नाव न घेता लगावला.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांनी संघटनेत प्रामाणिक काम न करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू, असे सांगून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गीते यांच्यावर विश्वास दाखवून केंद्रात प्रथम मंत्रीपद दिल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी जिल्ह्यातील दोन राष्ट्रवादीचे आमदार हे शिवसेनेतील गद्दारांनीच निवडून दिले, याचीच चीड असून संघटनेत स्वच्छता अभियान सुरू करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.
मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, रायगडचे जिल्हाप्रमुख विजय सावंत, उपजिल्हाप्रमुख निगुडकर, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, सुभाष बने, खेड तालुकाप्रमुख राजा बेलोसे, अरविंद विचारे, मधुकर शिरगावकर, बापू पाटणे, भगवान घाडगे, महिला जिल्हा संघटक दर्शना महाडीक, महिला आघाडीप्रमुख रेखा गीते, मंडणगडचे संतोष घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्या महिपत पाटणे, सुरेश पालांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


भूसंपादनाला सहकार्य करा...
गीते यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ४ हजार कोटींचा हा प्रकल्प असून या प्रकल्पाच्या भुमीसंपादनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी रेल्वे दुपदरीकरणाची कल्पना मांडताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही मागणी मान्य केल्याचे सांगत रोहा ते चिपळूण मार्गाचे सर्व्हेचे काम आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होईल, असे सागितले.


पेपरमिलचा विरोध मोडून काढू...
कोकणातील १ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देणारा पेपर मिल हा उद्योग लोटे एमआयडीसीमध्ये येत आहे. २४०० कोटींचा हा उद्योग कोकणची प्रगती करणारा ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पास कोणीही विरोध करू नये अन्यथा हा विरोध आपण मोडून काढू, असा इशारा अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिला आहे. उद्योगातून अन्य १० हजार लोकांना पूरक रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: 'Kadam' Target in the program of Infinite Songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.