कडवई, असुर्डेला स्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2016 10:45 PM2016-03-25T22:45:25+5:302016-03-25T23:41:08+5:30
सुरेश प्रभू : कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली स्थानकाचे उद्घाटन
रत्नागिरी : गेल्या वीस वर्षात कोकण रेल्वेच्या विकासाबाबत नकारघंटा वाजवण्यात आली. मात्र, गेल्या दीड वर्षात अनेक सुविधा कोकण रेल्वेमार्गावर उपलब्ध झाल्या आहेत. नवीन सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळेच कोकण रेल्वे कोकणवासीयांना आता आपली वाटू लागली आहे. या मार्गावर कडवई, असुर्डे, चिंचवली, बोर्डवेसह ११ नवीन स्थानके उभारण्याचा प्रस्तावही मंजुुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वेरवली येथे केली.
लांजा तालुक्यात कोकण रेल्वेमार्गावर वेरवली येथे नवीन स्थानक उभारण्यात आले आहे. चार महिन्यात पूर्ण झालेल्या या स्थानकाचे उद्घाटन रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी झाले. त्यावेळी प्रभू हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, आमदार राजन साळवी, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय प्रबंधक बाळासाहेब निकम, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, लांजा पंचायत समिती सभापती लीला घडशी, उपसभापती प्रियांका रसाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, जिल्हा परिषद सदस्या वृषाली कुरुप, सरपंच पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, पूर्वी कायम नन्नाचा पाढा वाचला जायचा. कुठलेही काम सुचविले की नकाराचे पत्र यायचे. आता ही स्थिती बदलली आहे. कोकणी माणसांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. त्यामुळेच वेरवली हे स्थानक कमीत कमी वेळात म्हणचेच भूमिपूजनानंतर अवघ्या चार महिन्यात पूर्ण झाले आहे. पूर्वी केवळ प्रकल्पाची घोषणा झाली की, तो प्रकल्प झाला असे समजले जायचे. वर्षानुवर्षे असे प्रकल्पच होत नव्हते. केवळ भूमिपूजनाच्या पाट्यांवर पाट्या लावल्या जायच्या. ही स्थिती मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार आल्यानंतर बदलली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपण केलेल्या १३९ घोषणांचे काय झाले, याचा अहवाल आपण यावेळच्या अर्थसंकल्पावेळी मांडला आहे. पूर्वी निविदा निघायला तीन वर्षे जायची. आमच्या काळात जास्तीत जास्त ३ ते ६ महिन्यात निविदा निघतात, हा कारभारातील फरक आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, वेरवली स्थानकाची घोषणा झाली, चार महिन्यांपूर्वी भूमिपूजन झाले व आता स्थानकाचे उद्घाटन झाले. खरेतर वेरवलीवासीयांना शिमग्याची पालखी पावली आहे. अवघ्या चार महिन्यात या स्थानकाचे काम झाले हा इतिहास आहे. कोकण रेल्वे आता आम्हाला आमची वाटू लागली आहे. कोकण रेल्वेमार्गावर आणखी ११ स्थानके होणार आहेत. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील कडवई, असुर्डे, चिंचवली व बोर्डवे या नवीन स्थानकांचा समावेश असून, त्याना लवकर मंजुरी दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
प्रभूंचा विरोधकांना टोला : नकारघंटेची छापील पत्र केली नष्ट
कोकण रेल्वे प्रकल्प होऊन दोन दशके झाली. कोकण रेल्वेच्या कोणत्याही कामाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला की, कायमस्वरुपी छापून ठेवलेले नकारघंटेचे पत्र यायचे. गेल्या दीड वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने ही नकारघंटेची छापील पत्र नष्ट केली, असा टोला मंत्री प्रभू यांनी लगावला.
उत्पादनांना बाजारपेठ
महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कोकण रेल्वे व भारतीय रेल्वेच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात व परदेशातही ही उत्पादने विक्री व्हावीत, याकरिता चर्चा सुरू आहे, असे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले.
देशातील रेल्वे विकासासाठी १ लाख २१ हजार कोटींची तरतूद.
चाळीस हजार कोटींचे नवीन कारखाने उभारले जाणार.