कडवई ‘पाणलोट’कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Published: December 22, 2015 01:17 AM2015-12-22T01:17:01+5:302015-12-22T01:17:14+5:30

संगमेश्वर तालुका : टक्केवारी मिळत नसल्याने कामे खोळंबली?

Kadvai 'waterlog' ignores officials | कडवई ‘पाणलोट’कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कडवई ‘पाणलोट’कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Next

आरवली : पाणलोेट समिती सक्षम असतानाही कडवई येथील पाणलोट विकासकामांकडे कृषी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने पंचक्रोशीत कोणतेही ठोस विकासकाम होऊ शकले नसल्याची खंत पाणलोट सदस्यांनी व्यक्त केली. संगमेश्वर तालुक्यातील पाणलोट अधिकाऱ्यांना अपेक्षित टक्केवारी मिळत नसल्यानेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाणलोट समिती अध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी केला आहे.
संगमेश्वर तालुक्यात कडवई पाणलोट समिती स्थापन झाल्यावर फार मोठा निधी विकासकामांसाठी मिळणार असल्याचा गाजावाजा ग्रामसभांमधून करण्यात आला. प्रत्यक्षात पाच वर्षात केवळ तीन बंधारे बांधण्यापलिकडे कोणतेही ठोस काम झालेले नाही. वैयक्तिक लाभार्थींचे आराखडे तयार करण्यापलिकडे कोणतीही प्रगती झालेली नाही. सुरुवातीच्या निधीतून आणलेली कृषी अवजारे अतिशय निकृष्ट दर्जाची होती, ती आता सडत पडली आहेत. याविरोधात अनेक ग्रामसभांमधून आवाज उठवूनही त्यावर पर्याय काढणे आजतागायत शक्य झालेले नाही.
पाणलोटचे कृषी अधिकारी तर बंधाऱ्यांच्या कामाशिवाय कोणत्याही कामाकडे लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. बंधाऱ्यांच्या कामात सरळ सरळ ३० टक्के कमिशनची मागणी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या पाच वर्षात येथे येणारा कोणताही तालुका कृषी अधिकारी जास्त काळ टिकू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या होत असल्याने खाते बदल करण्यातच येथील पाणलोट सचिवांचा कालावधी वाया गेला, असा आरोप होत आहे. सिमेंटसाठी आगाऊ धनादेश देऊनही संबंधित कंपन्या सिमेंटचा पुरवठा करू शकलेल्या नाहीत. सिमेंटची कंपनी बदलल्यानंतर पाणलोट समितीला विश्वासात न घेता धनादेश परस्पर दुसऱ्या कंपनीला देण्यात आल्याचे समजते. स्थानिक बाजारपेठेतून कडवईतील पाणलोट समितीने ९५ हजारांचे सिमेंट कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशाने खरेदी केले. मात्र, सहा महिन्यांनंतर संबंधित कंपनीकडे असणारे पाणलोट समितीचे ९५ हजार रुपये कडवई पाणलोट समितीच्या खात्यात आजतागायत जमा होऊ शकले नाहीत. वेळ आल्यावर याबाबतचे सर्व पुरावे आपण सादर करू, असे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी व बेफिकीर वागण्यामुळेच कडवईतील विकासकामांना खीळ बसली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पाणलोट समिती अध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी केली आहे. (वार्ताहर)


कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बंधाऱ्याचे एकही काम पूर्ण झालेले नाही. सुरु कामांची रक्कम जबरदस्तीने परत घेण्यात आली. कृषी अधिकारी स्वत: ठेकेदार असल्यासारखे वागत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील अनेक बंधाऱ्यांची कामे कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला देऊन कमिशन कमी होणार नाही, याची काळजी घेण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी केला आहे.

Web Title: Kadvai 'waterlog' ignores officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.