कणकवलीत १३ मे पासून कलशारोहण सोहळा
By admin | Published: May 11, 2015 12:54 AM2015-05-11T00:54:36+5:302015-05-11T00:55:09+5:30
नाशिक गोवर्धन येथील दत्तदास महाराज प्रमुख उपस्थित
कणकवली : शहरातील बांदकरवाडी येथील श्री दत्तमंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा १३ ते १६ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. नाशिक गोवर्धन येथील दत्तदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कलशारोहण सोहळा होणार आहे.
कणकणवली शहरातील बांदकरवाडी येथे हे दत्तमंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून मंदिराचा कलशारोहण समारंभ १३ ते १६ मे यादरम्यान विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने १३ मे पासून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ७ वाजता श्री स्वयंभू मंदिर ते दत्त मंदिरापर्यंत कलश दिंडी, सकाळी ९ वाजता पुण्याहवाचन, मातृकापूजन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यानंतर सुश्राव्य भजने, रात्री ८ वाजता लांजा धुंदरे येथील श्री वांजूदेवी नाट्य नमन मंडळाचा ‘नमनाचा कार्यक्रम’ होणार आहे. १४ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम तसेच कलशारोहण, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता सुश्राव्य भजने, सायंकाळी ४ वाजता ह. भ. प. गवंडळकर महाराज यांचा हरिपाठ, रात्री ८ वाजता हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, १५ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री ८ वाजल्यापासून आवळेगाव येथील सचिन भाटवडेकर यांचे प्रवचन तर रात्री ९ वाजता आर्ट सर्कल देवगड प्रस्तुत तीन अंकी संगीत नाटक ‘संत गोरा कुंभार’, १६ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आनंदवर्धिनी प्रस्तुत गुरुवंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, तर रात्री ९ वाजता खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाचा ‘कली प्रताप’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. (वार्ताहर)