सिंधुदुर्गात कला अकादमीच्या धर्तीवर कलादालन
By admin | Published: January 18, 2015 11:06 PM2015-01-18T23:06:19+5:302015-01-19T00:24:25+5:30
दीपक केसरकरांची घोषणा : अण्णा भाऊ साठे संमेलनाचा सावंतवाडीत समारोप
सावंतवाडी : सिंधुुदुर्ग जिल्ह्यात गोवा कला अकादमीच्या धर्तीवर कलादालन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. ते सावंतवाडी येथे भरविण्यात आलेल्या सहाव्या राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी संमेलन अध्यक्ष सतीश काळसेकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कॉ. गोविंद पानसरे, सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष बबन साळगावकर, लेखक प्रवीण बांदेकर, जयप्रकाश सावंत, अॅड. संदीप निंबाळकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडीला इतिहास आहे तो येथील कलेचा. राजघराण्यांनी नेहमीच सावंतवाडीतील कलाकारप्रेमींना आपलेसे केले आहे. तीच परंपरा आजही कायम जोपासण्यात आली असून, सावंतवाडी नगरपालिका तसेच काम करीत आहे.राज्य सरकार हे नेहमीच कलाकारांच्या पाठीशी राहिले असून, गोवा कला अकादमीच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कलादालन करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी त्यांनी घाटी व कोकणी वादावर मत मांडताना सांगितले की, घाटावरचे शिक्षक कोकणात येतात, पण येथील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले असल्याचे स्पष्ट करत तेथे अतिरिक्त झालेले शिक्षक कोकणात पाठवले जातात, असा टोलाही उपस्थितांना लगावला.संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांनी सांगितले की, सावंतवाडीत अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाप्रमाणेच कविसंमेलनही भरविले जावे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. संमेलनाचे उद्घाटक सुनीलकुमार लवटे यांनी विविध अंगांनी कोकणचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. यात कोकणातील लोक साधेभोळे म्हटले जातात, पण तेवढेच ते हुशार असतात, असे मत मांडले. मी अनेक शब्द हे कोकणातून उचलले असून, त्यांचे चांगले अनुभव मला येतात. याचे एक उदाहरण म्हणून त्यांनी ‘मी मुलांना पोरं म्हणत असे, पण माझ्या कोकणातील मित्रांमुळेच पोरं न म्हणता मुलं म्हणू लागलो. यातून पोरं कोणाला म्हणतात, मुलं कोणाला म्हणतात याचा अर्थ त्यांनी पटवून दिला’, असे सांगत कोकणच्या माणसाकडे संस्कृतपणा असतो, असे स्पष्ट केले.डॉ. गोविंद काजरेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण बांदेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सावंतवाडीत खांडेकर व साठे स्मारक होणार
सावंतवाडीत वि. स. खांडेकर तसेच अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले. असा ठराव संमेलनात मांडला.
घाट म्हणजे युरोप आणि कोकण म्हणजे भारत
संमेलनाचे उद्घाटक सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या भाषणात कोकण म्हणजे भारत, तर घाट म्हणजे युरोप असे सांगत घाटावर कंटाळा आला तर कोकणात येण्याचे भाग्य वेगळेच असते. कोकणात जास्तीत जास्त समृद्धी ही घाटावरच्या शिक्षकांनीच आणल्याचे लवटे यांनी सांगितले.