काळसेकरांना गृहमंत्री भाजपचा असल्याचा विसर
By admin | Published: November 13, 2015 08:55 PM2015-11-13T20:55:53+5:302015-11-13T23:41:41+5:30
मच्छिमार संघर्ष : मनसेची टीका, पोलिसांची आचऱ्यात एकतर्फी कारवाई
कुडाळ : आचरा येथील पारंपरिक व पर्ससीननेट मच्छिमारांच्या संघर्षात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली, असा आरोप भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली. मात्र, काळसेकर यांना राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे असल्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अतुल काळसेकर हे नक्की सत्ताधारी पक्षाचेच जिल्हाध्यक्ष आहेत ना,
असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत पोलीस प्रशासन येते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत व ते भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मच्छिमारांच्या संदर्भात पोलीस एकतर्फी कारवाई करतात, असे विधान करणे म्हणजे गृहमंत्री फडणवीस यांच्या अपयशाला दुजोरा दिल्यासारखे आहे. पारंपरिक मच्छिमारांवर एकतर्फी कारवाई करत असताना राज्याचे पालकमंत्री झोपले होते का?
दिवाळी तोंडावर असताना गोरगरीब पारंपरिक मच्छिमारांची धरपकड सुरू होती. तेव्हा काळसेकर कोणत्या बिळात दडून बसले होते? गृहमंत्र्यांचे आदेश आणून पारंपरिक मच्छिमारांवरील एकतर्फी कारवाई का थांबवली नाही? असे प्रश्नही मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहेत.
तसेच आता पोलिसी कारवाईनंतर वर्तमानपत्रातून मगरीचे अश्रू ढाळून मच्छिमारांचे दु:ख आणि मन:स्ताप यत्किंचितही कमी होणार नाही, असा टोलाही परब यांनी काळसेकरांना हाणला आहे. (प्रतिनिधी)
तेव्हा कुठे होते काळसेकर?
आमदार वैभव नाईक यांना अटक करून दाखवाच, मग आम्ही काय ते दाखवून देऊ, अशी भीमगर्जना करणारे काळसेकर पारंपरिक मच्छिमारांवर कारवाई होताना गप्प का होते, असा सवाल परब यांनी विचारला आहे. गोरगरिबांपेक्षा सहकारी पक्षातील आमदारांची सुरक्षा महत्त्वाची वाटणारे काळसेकर यांनी मच्छिमारांवरील कारवाई रोखून दाखवली असती, तर ते नेमके काय चीज आहेत, हे जिल्हावासीयांना समजले असते.
एकीकडे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर पारंपरिक व पर्ससीननेटधारक यांच्यात समन्वयासाठी बैठक आयोजित करीत असताना काळसेकर मात्र पारंपरिक मच्छिमारांचीच बाजू घेताना दिसत आहेत. यावरून जिल्ह्यातील भाजप नेत्यांची भूमिका संदिग्ध दिसत आहे. फक्त मासे खाण्यापलीकडे मच्छिमारी संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेले राज्याचे मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे हेही जबाबदार आहेत. त्यांच्याकडे भाजप नेते केवळ फोटोंसाठी निवेदने देतात. काळसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून द्यावी. काळसेकर हे गेली १५ वर्षे विरोधी पक्षात असल्याने विरोधक ते सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष ही गेल्या वर्षभरातील स्थित्यंतरे काळसेकर यांना मानवलेली नाहीत. त्यांचे आचरण अजूनही सत्ताधाऱ्यांसारखे नसून विरोधकांसारखेच असल्याचा टोला परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे.