अर्थकारण सक्षम बनविणारा कल्पवृक्ष
By admin | Published: September 1, 2014 09:35 PM2014-09-01T21:35:38+5:302014-09-02T00:04:28+5:30
आज जागतिक नारळदिन : उत्पादनासह प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज
अजय लाड - सावंतवाडी --नारळ व नारळापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून नारळ उत्पादनातून अर्थकारण सक्षम करण्याच्या उद्येशाने १९९८ पासून दरवर्षी २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. यानिमित्त नारळ उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण व उत्पादनाच्या प्रसारासाठी मेळावे आयोजित करत जागृती आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नारळ उत्पादनासह प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रीत केल्यास शेतकऱ्यांना या कल्पवृक्षामुळे सोन्याचे दिवस निश्चितच दिसतील.
नारळ वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. आंबा जरी फळांचा राजा मानला जात असला तरीही नारळाच्या उत्पादनाने जिल्हासह देशाच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो. दरडोई उत्पन्न वाढीकरिता नारळाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी व बागायतदारांनी लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. नारळ उत्पादन वाढीसाठी केल्या जाणाऱ्या संशोधनाचा व व्यापाऱ्याच्या अनुषंगाने एशियन अॅण्ड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी या संस्थेची स्थापना २ सप्टेंबर १९६९ रोजी करण्यात आली. भारत, फिजी, इंडोनेशिया, मार्शल बेटे, पापोआ न्यू जिनोवा, सामोवा, रिपब्लीक आॅफ किरीबाती, श्रीलंका, थायलंड, सोलोमान बेटे, टोंगा, वनाटू, व्हिएतनाम व जमैका हे या संस्थेचे पूर्ण सभासद आहेत. तर केनिया हा सहभागी सदस्य आहे. या संस्थेच्या पंचविसाव्या परिषदेमध्ये नारळ उत्पादनाच्या प्रसाराकरिता संस्थेच्या स्थापना दिनी जागतिक नारळ दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. व त्यानंतर दरवर्षी जागतिक नारळ दिनी या कल्पवृक्षाच्या वाढीसाठी प्रचार व प्रसार केला जात आहे.
नारळ दिनानिमित्त दरवर्षी एक थीम असते. यावर्षी 'नीरा- भारतातील नारळ क्षेत्रातील भविष्य' या थीमनुसार देशात जागतिक नारळ दिन साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातही वर्षभर नारळ वाढीसाठी नारळ विकास मंडळातर्फे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यामध्ये नारळावरील कीड व रोग व्यवस्थापन, खतांचे व्यवस्थापन, शिडीच्या साहाय्याने नारळावर चढण्याचे प्रशिक्षण, तसेच नारळापासून बनविण्यात येणाऱ्या विविध उत्पादनात लोक सहभागासाठी प्रशिक्षणे घेतली जात आहेत. वेंगुर्ले येथील महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्थेतर्फेही महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात नारळ वृक्ष मित्रांची निवडही करण्यात आली आहे. त्याच्याव्दारे नारळाच्या उत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नारळाच्या वाढीसाठी आवश्यक माती, अनुकूल वातावरण, लागवड करताना घ्यावयाच्या काळजी, पोषण द्रवांचे व्यवस्थापन, नारळ बागेची संकल्पना रुजविण्याकरिता प्रशिक्षणे घेतली जात आहेत. नारळ हा खरोखरच कल्पवृक्ष असून शेतकऱ्यांना याच्या लागवडीतून आर्थिक संपन्नता प्राप्त होऊ शकते. यासाठी नारळ उत्पादन मर्यादीत न ठेवता त्याच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली पाहिजे.
उत्पादनवाढीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नातून नारळ लागवड क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. महसूल विभागाच्या आकडीवारीनुसार कोकणात सुमारे २३ हजार हेक्टरपर्यंत लागवड असली तरीही कृषी विभागाच्या माहितीनुसार हा आकडा ३५ हजार हेक्टर एवढा आहे. त्यामुळे नारळ उत्पादन वाढ होत असल्याचेच दिसून येत आहे. राज्य शासनातर्फे १९८९ पासून सुरु करण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल राहिला. व नारळ उत्पादनाला चालना मिळाली आहे.
कल्पवृक्षाचे विविध फायदे
नारळ या कल्पवृक्षाच्या विविध भागांचा वापर विविध वस्तू साकारण्यासाठी केला जात आहे. नारळापासून तेल, काथ्यापासून विविध वस्तू, करवंट्याचा वापर हस्तकला, सक्रीय कार्बन व पावडर बनविण्यासाठी केला जातो. नारळापासून आरोग्यदायक नीरा, ताडी, पाम साखर, गूळ यासारखी उत्पादनेही घेतली जातात. त्यामुळे नारळाच्या उत्पादनसह प्रक्रिया उत्पादनाकडे लक्ष पुरविल्याची गरज आहे. नारळाच्या वृक्षाला पैसे लागत नसले तरी या कल्पवृक्षामुळे पैसे नक्कीच मिळतील व शेतकरी, बागायतदारांच्या घरादारात खऱ्या अर्थाने संपन्नता नांदेल. नारळ क्षेत्रासह उत्पादनवाढ होत असली तरीही उत्पादकांनी यामध्ये लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
आरोग्यासाठीही लाभदायक
नारळ हे फळ आरोग्यासाठीही लाभदायक आहे. नारळातील खोबरे हृदय व फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेसाठी चांगले उपयुक्त असते.
तसेच शहाळ्याच्या पाण्यातील ग्लूकोज हे रक्तात सहजरित्या मिसळल्याने एनर्जी ड्रिंक्स म्हणून काम करते.
खोबरेल तेलात स्निग्धता जास्त असल्याने त्वचेच्या काळजीसाठी हे तेल उपयुक्त ठरते.
नारळ बागांवर इरिओफाईड कोळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे.
कोळी रोगाच्या प्रादुर्भावाने नारळ फळावरील साल पातळ, सुरकुतलेली होते.
तसेच नारळाचे फळही छोटे होत जाते.
यामुळे उत्पादन कमी मिळण्याचा व फळगळीचा धोका निर्माण झाला आहे. कीड नियंत्रणासाठी योग्य नियोजन केल्यास यावरही मात केली जाऊ शकते.
महाराष्ट्राला राष्ट्रीय नारळ दिन साजरा करण्याची संधी २0१२ मध्ये मिळाली होती.
नारळ विकास मंडळाच्यावतीने गणपतीपुळे येथे हा कार्यक्रम झाला होता.
यावेळी सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.
त्यामुळे शेतकऱ्यांमधील जागरुकताही दिसून आली होती.
नारळासंबंधी प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास आर्थिक संपन्नता येईल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले होते. त्यानुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कल्पवृक्षाच्या उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.