विज्ञान केंद्राला कल्पना चावलाचे नाव
By admin | Published: March 9, 2015 08:14 PM2015-03-09T20:14:47+5:302015-03-09T23:56:39+5:30
सावंतवाडी नगर परिषद व महिला विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन --नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात होणाऱ्या विज्ञान केंद्राला भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला हिचे नाव देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले. सावंतवाडी नगर परिषद व महिला विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष साळगावकर बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेविका अनारोजीन लोबो, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पटेकर, साहित्यिका वंदना करंबेळकर, शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर आदी उपस्थित होते.
आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पोलीस अधीक्षक, शासकीय अधिकारी, संशोधन क्षेत्रात, क्रीडा क्षेत्र अशा विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांनी आपण पुरुषांच्या मागे आहोत, असा न्यूनगंड मनात न बाळगता आपली कामगिरी सुरू ठेवावी, असे आवाहन नगराध्यक्ष साळगावकर यांनी केले. महिलांसाठी अनेक कायदे आहेत. मात्र, कायद्यांची समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जनजागृती होणे आवश्यक आहे. जोपर्यंत या महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती होत नाही, तोपर्यंत या कायद्यांचा काहीही उपयोग नाही, असे महिला व बालकल्याण सभापती वैशाली पटेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
महिलांचा सत्कार
महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत त्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये कवयित्री कल्पना बांदेकर, शिक्षिका मेघना राऊळ, कवयित्री शरयू आसोलकर, धाडसी नेतृत्व नम्रता केसरकर, उत्तम खासगी उपहारगृहचालक अनिता रसाळ, अर्चना अरविंद नार्वेकर, कवयित्री उषा परब व महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडाक्षेत्रातील अमेय मोरजकर, शिष्यवृत्ती उत्तीर्ण पार्थ शंतनू तेंडुलकर, अंबर नागेश गावडे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.