कुडाळेश्वर मंदिरावर आज कलशारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2015 10:14 PM2015-05-14T22:14:48+5:302015-05-14T23:57:52+5:30
विविध कार्यक्रम : स्वामी सद्गुरू सरस्वती स्वामींची उपस्थिती
कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर मंदिरच्या सुवर्ण कलशाचे कलशारोहण शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ९ वाजता कर्नाटक येथील बसवकल्याण मठाधिपती श्री श्री श्री दामोदरपंत स्वामी सद्गुरू सदानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला भाविक व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कुडाळचे अध्यक्ष प्रसाद धडाम यांनी पत्रकार परिषदेत केले.
कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या मुंगसाळी मंडपाचे नुतनीकरणाचे काम सुरू असून, या मंडपावर सुवर्ण कलशाचे कलशारोहण १५ मे रोजी होणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, कुडाळचे सदस्य सुनील भोगटे म्हणाले, मंदिराच्या मुंगसाळी मंडपाला वापरलेली लाकडे १२५ वर्षांपूर्वीची असल्याने ती जीर्ण झाली होती.
त्यामुळे येथील ग्रामसभेत व देवस्थान सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे या मुंगसाळी मंडपाच्या नुतनीकरणाचे काम झाले असून, या मंडपाला वापरण्यात आलेले सर्व लाकूड सागवानी आहे. याचा खर्च सहा लाख रुपये काढण्यात आला होता. मात्र, हा खर्च १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सुवर्णकलश पसंती
या मुंगसाळीचे काम करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते सुवर्णकलशच बसविण्याचे ठरविण्यात आले. सर्व भाविक -भक्तांनी या सुवर्णकलशासाठी सुमारे १६० ग्रॅम सोने दिले. तसेच इतर कामांसाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत भाविकांनी केली.
दगडी मंदिर नको- देवतेची आज्ञा
कुडाळचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वराचे मंदिर भव्यदिव्य बांधण्याची आम्हा सर्वांची इच्छा होती व तसा कौलही लावण्यात आला होता. मात्र, देवाने तसा प्रसाद दिला नाही. त्यामुळे ज्या पद्धतीचे सध्याचे मंदिर आहे, तसेच मंदिर असावे, अशी देवाची इच्छा असावी. देवाच्या आज्ञेप्रमाणेच मुंगसाळी मंडपाचे काम पूर्वापार पद्धतीनेच करण्यावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)
लाकडावर कोरीव काम स्थानिकांकडून
मंडपासाठी वापरण्यात आलेल्या सागवानी लाकडावरील कोरीव काम नेरूर येथील विलास मेस्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून ते येथील स्थानिक कलाकार आहेत, हे विशेष. कलशारोहण सोहळ्यानिमित्त १५ मे रोजी पहाटेपासून धार्मिक कार्र्यक्रम, १० वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमराज शिवराम सावंत-भोसले राजेसाहेब यांचे शाही स्वागत व औक्षण, ११ वाजता सुवर्ण कलशाची श्री देव कुडाळेश्वर मंदिरास प्रदक्षिणा व ११.१५ वाजता श्री श्री श्री दामोदरानंद स्वामी यांच्याहस्ते कलशारोहण असे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे हिरोजी उर्फ दादोजी परब उपस्थित राहणार आहेत. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ६ वाजता आजगावर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.