भालचंद्र नामाच्या गजराने कनकनगरी दुमदुमली , ११६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 07:30 PM2020-01-17T19:30:53+5:302020-01-17T19:32:40+5:30

गुरुवारीही जयंती दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला. सुहासिनीनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या बालमूर्तिला पाळण्यात घालून झोके दिले.

 Kanakanagari Dumdumli by the alarm of Bhalchandra Naam | भालचंद्र नामाच्या गजराने कनकनगरी दुमदुमली , ११६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

भालचंद्र नामाच्या गजराने कनकनगरी दुमदुमली , ११६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

Next
ठळक मुद्देशहरातून पालखी मिरवणूक : भाविकांची मांदियाळी

कणकवली : ह्यदिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबराह्णच्या जयघोषाने गुरुवारी सायंकाळी कणकवलीनगरी दुमदुमून गेली. निमित्त होते ते येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ११६व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढलेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

१२ जानेवारीपासून येथील आश्रमात परमहंस भालचंद्र महाराजांच्या जयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता. गुरुवारपर्यंतच्या कालावधीत याठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकडआरती, समाधी पूजन, भालचंद्र याग, आरती, भजने, कीर्तन, दशावतारी नाटक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.

गुरुवारीही जयंती दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला. सुहासिनीनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या बालमूर्तिला पाळण्यात घालून झोके दिले. हा सोहळा पाहताना अनेक भाविकांनी आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

सायंकाळी ६ वाजल्यानंतर कणकवली शहरातून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोडे, उंट तसेच वारकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते. भाविकांनी केलेल्या भालचंद्र नामाच्या जयघोषाने कणकवलीनगरी दुमदुमून गेली होती.

शहरातील तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळ, बाजारपेठेतील महापुरुष मित्रमंडळ, रिक्षा संघटना, अप्पासाहेब पटवर्धन चौक मित्रमंडळ तसेच इतर अनेक मंडळांनी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार तसेच चहा-पाण्याची सोय केली होती. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा सुबक अशी रांगोळी काढली होती. विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. अनेक मंडळानी परमहंस भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील देखावेही पालखी मिरवणुकीच्या मार्गावर चौका-चौकात उभारले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरणच भक्तिमय बनले होते.

ही पालखी मिरवणूक रात्री पुन्हा आश्रमात आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर कुडाळ-नेरूर येथील सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग झाल्यावर या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. दरम्यान, या जयंती महोत्सवासाठी गोवा, मुंबई, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील अनेक भाविक कणकवलीत दाखल झाले होते. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

Web Title:  Kanakanagari Dumdumli by the alarm of Bhalchandra Naam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.