झिंग झिंग झिंगाटच्या गाण्यावर कणकवलीकर थिरकले, अजय-अतुलची म्युझिकल नाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:09 PM2019-02-05T13:09:35+5:302019-02-05T13:11:12+5:30
कणकवली पर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात रविवारी प्रख्यात संगीतकार अजय-अतुल या जोडीने कणकवलीकरांना आपल्या गाण्यांच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचायला लावले. तरूणांसह बच्चे कंपनीने रंगमंचा समोर येऊन ठेका धरला. झिंग-झिंग झिंगाट सह डॉल्बी डॉल या गाण्यांवर कणकवलीकरांनी ठेका धरला. त्यामुळे अजय-अतुल म्युझिकल नाईट सिंधुदुर्ग वासियांसाठी खऱ्या अर्थाने यादगारच ठरली.
कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात रविवारी प्रख्यात संगीतकार अजय-अतुल या जोडीने कणकवलीकरांना आपल्या गाण्यांच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचायला लावले. तरूणांसह बच्चे कंपनीने रंगमंचा समोर येऊन ठेका धरला. झिंग-झिंग झिंगाट सह डॉल्बी डॉल या गाण्यांवर कणकवलीकरांनी ठेका धरला. त्यामुळे अजय-अतुल म्युझिकल नाईट सिंधुदुर्ग वासियांसाठी खऱ्या अर्थाने यादगारच ठरली.
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पेतून साकारलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि सहकाऱ्यानी योग्य नियोजन केले होते. या महोत्सवात चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. अजय-अतुलच्या म्युझिकल नाईटसाठी सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने असंख्य प्रेक्षक लहान मुलांसह कणकवलीत रविवारी दाखल झाले होते.
रात्री उशिरापर्यंत या महोत्सवातील सांगीतिक कार्यक्रम रंगला होता. खाद्य पदार्थांच्या स्टॉलला देखील खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील संपूर्ण मैदान गर्दीने फुलले होते.
रंगमंचावर अजय-अतुलची जोडी ह्यदेवा श्री गणेशा़ !ह्ण या गाण्याच्या साथीने दाखल झाली. आणि काही वेळातच सिंधुदुर्गवासियांना त्यांनी आपल्या गायकीने भुरळ घातली.
अशा कार्यक्रमांना मोठ्या शहरांमध्ये जशी गर्दी असते तशीच या महोत्सवाच्या निमित्ताने पहायला मिळाली. तरूण-तरूणींनी उत्स्फुर्तपणे रंगमंचा समोर धाव घेत अजय-अतुलच्या गीतांच्या साथीने ठेका धरला.
अजय-अतुल यांनी 'देवा श्री गणेशा' , 'याड लागलं रं....' , ' आता रूसायचे नाय' , 'रंग उरलेला लावून टाक...' , 'ये डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला' ,' झिंग झिंग झिंगाट़' , ' तुझ्या प्रिरतीचा हा विंचू मला चावला', यासह विविध गाण्यांवर कणकवलीकरांना नाचविले. अनेक गाण्यांवर 'वन्स मोअरची' मागणी प्रेक्षकांमधून झाली. केवळ तासाभराच्या कालावधीत हजारो प्रेक्षकांच्या मनावर अजय-अतुल या जोडीने अधिराज्य गाजविले.
त्यानी प्रेक्षकांना रंगमंचा समोर नाचण्यासाठी आमंत्रीत केले. त्यामुळे एकच गर्दी उसळली. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह मान्यवरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. रंगमंचासमोर मोकळ्या जागेत सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी ताल धरत अजय-अतुलचा उत्साह आनखिनच वाढविला. त्यामुळे कणकवली महोत्सवाचा सांगता सोहळा सर्वांसाठीच यादगार ठरला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अनेक कलाकारांनी आपली कला या महोत्सवात सादर केली.
राणेंच्या एका फोनवर आम्ही कणकवलीत !
कणकवलीच नव्हे तर संपुर्ण कोकणातील अजय-अतुलचा हा पहिला कार्यक्रम होता. एवढी गर्दी होईल याची कल्पना आम्हाला नव्हती. कणकवलीत महोत्सव आहे. त्यावेळी तुम्हाला यायला लागेल. एवढा निरोप एका फोनवर आमदार नितेश राणे यांनी आम्हाला दिला. त्यापलिकडे आमचे बोलणे देखील झाले नाही. तरीपण राणे कुटुंबीयांच्या प्रेमा खातर आम्ही कणकवलीत आलो. कणकवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या प्रेक्षकांमुळे आमचे मन भारावून गेले आहे़. पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी पुढील काळात द्यावी, अशी प्रतिक्रीया प्रसिध्द संगीतकार गायक अजय गोगावले यांनी यावेळी दिली.