कांदळवन प्रकल्पातून देवली ग्रामस्थांना रोजगाराची दिशा, मत्स्यपालन व्यवसायाला मोठी चालना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 8, 2024 07:18 PM2024-04-08T19:18:40+5:302024-04-08T19:19:19+5:30
कांदळवने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त
संदीप बोडवे
मालवण : तालुक्यातील देवलीत सुरू असलेल्या कांदळवन उपजीविका प्रकल्पातून खाडीतील मत्स्यपालन व्यवसायाला मोठी चालना मिळाली. त्यातून ग्रामस्थांसाठी रोजगार व आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. शासनाने कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना कार्यान्वित केली. त्याची अंमलबजावणी कांदळवन कक्ष मुंबई आणि वनविभागातर्फे होते. जिल्ह्यातील किनारपट्टीच्या काही गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे.
देवलीला तीन-चार किमीची विस्तीर्ण कर्ली खाडी लाभली आहे. तीच पुढे तारकर्ली बीच पर्यंत जाते. त्यामुळे पर्यटन विकासाला येथे मोठा वाव आहे. वर्षभर पुरेल इतके भात उत्पादन गावातील प्रत्येक शेतकरी घेतो. आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी पिके शेतकरी घेतात. पूर्वी शासनाने चांदा ते बांदा योजना जिल्ह्यात राबवली होती. त्यात खाडीतील मत्स्यपालन व्यवसायाचा समावेश होता. देवलीतील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यातून पिंजऱ्यातील मत्स्यपालन सुरू केले. मात्र, दोन-तीन वर्षांनंतर ही योजना बंद झाली. परंतु आता तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या कांदळवन संरक्षण प्रकल्प योजनेमुळे पिंजऱ्यातील मत्स्यपालनास पुन्हा चालना मिळाली आहे.
कांदळवने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त
या योजनेंतर्गत व्यावसायिक, सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी गावात दोन सह व्यवस्थापन समित्या स्थापना केल्या आहेत. त्यातून तीन वर्षांपासून विविध कामे करण्यात येताहेत. कोकण किनारपट्टीवरील ३२ हजार हेक्टर क्षेत्रात कांदळवने आहेत. किनाऱ्याला असल्याने ही कांदळवने समुद्री वादळे, त्सुनामी सारख्या आपत्तींचा तडाखा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची चांगली क्षमता असलेली ही कांदळवने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहेत.
पिंजरा मत्स्यपालनाचा यशस्वी प्रयोग
कोकण किनारपट्टीवर कांदळवनाच्या २० प्रजाती आढळतात. त्यातील आठ देवलीतील कर्ली खाडीच्या किनारी पाहण्यास मिळतात. त्यांची तोड होणार नाही याची दक्षता समिती घेते. पिंजरा मत्स्यपालनाचा यापूर्वीचा अनुभव पाहता कर्ली खाडीकिनारी १६ पिंजरे सज्ज केले आहेत. तामिळनाडू, आंध्र आणि चेन्नई येथून मत्स्यबीज आणून उपसमित्यांना दिले जाते. जिताडा, काळुंद्री, शिंपले, कालवांचे उत्पादन घेण्यात येते. मत्स्यबीज वृद्धीसाठी अर्ध्या एकरात नर्सरी. तेथे तीन-चार महिने बीज वाढविले जाते. प्रतिपिंजऱ्यात ५०० पर्यंत बीज सोडण्यात येते. सहा महिन्यांत ते विक्री योग्य होते. माशांना सकाळी सात आणि सायंकाळी साडेसहा अशा दोन वेळेत खाद्य दिले जाते.
१० ते १२ लाखांची उलाढाल
जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा समुद्रातील मासेमारी बंद झाल्यानंतर पिंजऱ्यातील मासे विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविले जातात. या कालावधीत या माशांची मागणी वाढते. काळुंद्री माशाला प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपये दर मिळतो. या माशाला खाडीतील वातावरण पोषक ठरते. जिताडा माशाचे वजन एक ते बाराशे किलोपर्यंत जाते. त्यास प्रतिकिलो ४५० रुपयांपर्यंत दर मिळतो. कालवे, शिंपल्यातून ही उत्पन्नाचा स्रोत तयार होतो. मोठ्या कालव्यांना प्रती डझनला सरासरी २०० ते २५० रुपये दर मिळतो. प्रकल्पातून सुमारे १० ते बारा लाख रुपयांची उलाढाल होते.