कणकवलीतील गुन्हा मालवण पोलिसांकडे वर्ग का?, कन्हैया पारकर यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 02:53 PM2020-06-10T14:53:47+5:302020-06-10T14:55:36+5:30
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रकार नाही ना? असे सवाल उपस्थित करीत जिल्हा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती समजावून सांगत दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे तपास करून आपली विश्वासार्हता टिकवावी, असे आवाहन कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे.
कणकवली : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रकार नाही ना? असे सवाल उपस्थित करीत जिल्हा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती समजावून सांगत दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे तपास करून आपली विश्वासार्हता टिकवावी, असे आवाहन कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२० रोजी पोलीस कर्मचारी आशिष जामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित जावेद शेखसह कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक व संदीप नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २७ एप्रिल रोजी जावेद शेख याला अटक झाली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास हा मालवण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते.
कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्यावर असलेल्या पोलीस योद्ध्यावर हा हल्ला झाला होता. त्यातील संशयित हे राजकीय व्यक्ती आहेत. हा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. संशयित सापडत नसल्याने कणकवली नगराध्यक्षांचे वाहन पोलिसांनी जप्त केले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून पोलिसांना संशयित सापडलेले नाहीत. याप्रकरणाची ही पार्श्वभूमी पाहता, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुळात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असताना तो मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला? अशी कोणती अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली? ३५३ सारखा गुन्हा दाखल झालेला असताना आरोपी सापडत नाहीत, आरोपींची वाहने जप्त होतात, मात्र, ४१ ची नोटीस बजावताच आरोपी हजर कसे होतात? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना हल्ला झाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य अधिक आहे. या प्रकरणाला कोणतीही राजकीय बाजू नाही. कायद्याची जाण असलेल्या पोलिसानेच तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एखादे कलम वगळायचे असेल तर तक्रारदार पोलिसाला आपली तक्रार मागे घ्यावी लागणार आहे. तसे झाले तर पोलीस खोट्या तक्रारी करतात, असा संदेश सामान्य जनतेत जाण्याची शक्यता आहे. तसेच तक्रारदार पोलिसाला न्याय मिळाला नाही, तर पोलीस आपल्याच कर्मचाऱ्याला न्याय देऊ शकले नाहीत, तर इतरांचे काय? अशी भावना सामान्य माणसांत निर्माण होणार आहे.
याविषयी कोणतीही राजकीय भूमिका नाही : पारकर
कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात पोलिसांवर हल्ल्याच्या २५० घटना घडल्या. मात्र, सिंधुदुर्गात ही एकमेव घटना असून तीही कणकवलीतील आणि त्यात नगराध्यक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस दलाविषयीच्या विश्वासार्हतेचा आणि प्रतिमेचा प्रश्न आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात ढिलाई दाखविल्यास कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती आहे. याविषयी माझी कोणतीही राजकीय भूमिका नसून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चांचा कानोसा घेता ही प्रतिक्रिया देत आहे, असेही कन्हैया पारकर यांनी म्हटले आहे.