कनिका रावराणे अखेर झाल्या लेफ्टनंटपदी रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:40 PM2020-11-24T12:40:30+5:302020-11-24T12:43:37+5:30

IndianArmy , rawrane, sindhudurgnews शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या लेफ्टनंट झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

Kanika Ravrane finally joined as a lieutenant | कनिका रावराणे अखेर झाल्या लेफ्टनंटपदी रूजू

कनिका रावराणे अखेर झाल्या लेफ्टनंटपदी रूजू

googlenewsNext
ठळक मुद्दे शहीद मेजर कौस्तुभ रावराणेंच्या पत्नी नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण

वैभववाडी : शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या लेफ्टनंट झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

मेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट २०१८ मध्ये काश्मिरमधील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. ज्यावेळी ते शहीद झाले त्यावेळी त्यांचा मुलगा अवघा दोन वर्षांचा होता. त्यांची पत्नी कनिका ही मुंबईत एका ठिकाणी नोकरीला होती. परंतु मुलगा लहान असतानाही सैन्यात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्या सैन्याची परीक्षा चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाल्या.

मुलाखतीतदेखील त्या अग्रेसर होत्या. दरम्यान गेले नऊ महिने त्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत होत्या. प्रशिक्षणाचा हा खडतर टप्पा यशस्वीपणे पार पाडीत आता त्या लेफ्टनंट झाल्या आहेत.

कौस्तुभ रावराणे यांचे मूळ गाव सडुरे (ता. वैभववाडी) हे आहे. त्यांचे बालपण, शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. एक एक टप्पा यशस्वीपणे पार करीत ते सैन्यात मेजर पदापंर्यत पोहोचले. ज्यावेळी कौस्तुभ रावराणे हे शहीद झाले त्यावेळी संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली होती. त्यांचा अस्थिकलश तालुक्यातील अनेक गावांमध्ये दर्शनासाठी आणण्यात आला होता.

दरम्यान, आता त्यांच्या पत्नी कनिका यांनी कठिण परिस्थितीतून बाहेर पडत त्या सैन्यात लेफ्टनंटपदी रूजू झाल्यामुळे त्यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

दोन वर्षांचा मुलगा असतानाही सैन्यात दाखल झाली

देशासाठी लढताना आमचा कौस्तुभ शहीद झाला. त्यावेळी कुटुंब अक्षरश: कोलमडून पडले होते. परंतु देशासाठी शहीद होणे ही बाब अभिमानास्पद असली तरी कुटुंबाला त्यातून सावरताना खूप वेळ जात असतो. तरीदेखील कौस्तुभची पत्नी कनिका हिने दोन वर्षांचा मुलगा असतानाही सैन्यात जाण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे. गेली दीड-दोन वर्षे ती या सर्व प्रक्रियेतून जात होती. आता ती लेफ्टनंट झाली याचा आम्हांला खरोखरच आनंद आहे.
- विजय रावराणे,
कौस्तुभचे काका, सडुरे (ता. वैभववाडी)

Web Title: Kanika Ravrane finally joined as a lieutenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.