कणकवली शहर बाजारपेठ फुलली

By admin | Published: September 4, 2016 11:27 PM2016-09-04T23:27:22+5:302016-09-04T23:27:22+5:30

कणकवली शहरात रविवारी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. तर महामार्गावर वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या.

Kankavali city market fullsy | कणकवली शहर बाजारपेठ फुलली

कणकवली शहर बाजारपेठ फुलली

Next

कणकवली : कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला सोमवारी प्रारंभ होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरु असून मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रविवारी श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी लगबग सुरु होती. तर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्यामुळे रस्तेही वाहनांनी फुलून गेले होते.
कोकणात गणेशोत्सव म्हटला की सर्वांचाच आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. महागाई कितीही वाढली तरी काटकसर करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा विविधप्रकारे केली जाते. लहानथोर तयारीत गुंतलेले असतात.
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की, तयारीची कामे वेग घेत असतात. घराला रंगरंगोटी केली जाते. काहीजणांची ही तयारी तर अगदी गणपती घरात विराजमान होईपर्यंत सुरु असते.
यावर्षीही शुक्ररवारपासून सिंधुदुर्गात मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे रस्ते वाहनांनी फुलून गेले होते. बाजारपेठाही गजबजू लागल्या होत्या. शनिवारी तर कणकवली शहरात बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवारीही अशीच काहीशी स्थिती होती.
पूजेचे तसेच नैवेद्याचे साहित्य, गणरायाच्या अंगावरील वस्त्रालंकार, आरास करण्यासाठी लागणारे साहित्य अशा विविध वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. त्यातच रविवारी हरितालिका असल्याने शहाळी आणि विविध फळे खरेदी करण्यासाठीही गर्दी दिसून येत होती.
विविध भाज्यानांही जास्त मागणी होती. विजेवर चालणारी तोरणे, गौरीसाठी लागणारी सुपे असे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात भाविक गुंतले होते.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा शहाळ्यांचे ढीग रचून त्यांची विक्री करण्यात विक्रेते गुंतले होते. फुले तसेच धूप, अगरबत्ती, कापूर अशा गणेशाच्या पूजेसाठीच्या साहित्याचे स्टॉल्स रस्त्यावरच थाटण्यात आले होते. याठिकाणीही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.(प्रतिनिधी)
वाहतूक कोंडीचा फटका : वाहतूक पोलिस पथक तैनात
गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी आलेल्या मुंबईकर मंडळींनी रेल्वे, एस. टी. बरोबरच लक्झरी तसेच खासगी वाहनांना पसंती दिली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह अंतर्गत रस्तेही वाहनांनी फुलून गेले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे पथक कार्यरत होते. रविवारी सकाळपासूनच अधिकाऱ्यांसह पोलिस पथके कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नरत होती.
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
गणेश चतुर्थीदिवशी होणारी गडबड टाळण्यासाठी अनेक भाविकांनी रविवारीच श्री गणेशमूर्ती आपल्या घरी आणल्या. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ चा जयघोष करीत वाद्यांच्या गजरात गणेशमूर्ती घरी नेताना अनेक भाविक दिसत होते. या गणरायाला पाहून अनेकांचे हात नमस्काराच्या मुद्रेत जुळत होते.
 

Web Title: Kankavali city market fullsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.