कणकवली नगरपंचायत उभारणार कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 06:42 PM2021-04-16T18:42:12+5:302021-04-16T18:44:06+5:30
Kankavli CoronaVIrus Sindhdurg : कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना उपचारासाठी जागा उपलब्ध व्हावी यादृष्टीने कणकवली नगरपंचायतीच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
कणकवली : कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना उपचारासाठी जागा उपलब्ध व्हावी यादृष्टीने कणकवली नगरपंचायतीच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकेमार्फत उभारण्यात येणारे हे पहिलेच कोविड केअर सेंटर असणार आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात ह्यकमळ थाळीह्णसारखा उपक्रम राबविल्यानंतर आता या लॉकडाऊनच्या कालावधीत नगराध्यक्षांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
यादृष्टीने नगराध्यक्ष नलावडे यांनी नियोजन केले असून, या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या कोविड केअर सेंटरला मान्यता दिल्यावर ते शहरातील रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही नलावडे यांनी सांगितले. ह्यकमळ थाळीह्णसारख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या नावीन्यपूर्ण संकल्पनेपाठोपाठ जिल्ह्यात मॉडेल तत्त्वावर ही नावीन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणण्याचा मानस नलावडे यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक सुरू असताना रुग्णांना उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने, कणकवली शहरातील रुग्णांना अन्य ठिकाणी जावे लागू नये व त्यांना मोफत उपचार मिळावेत या दृष्टीने नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत आमदार नीतेश राणे यांचेदेखील लक्ष वेधण्यात आले असून, त्यांनीदेखील या संकल्पनेला पाठिंबा दिल्याचे नलावडे यांनी सांगितले.
या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व बाथरूमची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, कणकवली शहर मर्यादितच हे कोविड केअर सेंटर कार्यान्वित राहणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले. या सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्यानंतरच ते कार्यान्वित केले जाईल, असेही नलावडे यांनी सांगितले.
२५ बेडची व्यवस्था करणार
कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन सुविधा केंद्राची जागा नलावडे यांनी या सेंटरसाठी निश्चित केली आहे. त्याठिकाणी २५ बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तिथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांच्याशीदेखील संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याकडील डॉक्टरांकडून या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार व देखरेख करण्यात येणार आहे. याकरिता पर्यटन सुविधा केंद्राची साफसफाई करण्यात येत असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत परवानगी मागण्यासाठी संपर्क साधण्यात येणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.