कणकवली पंचायत समितीचे आरक्षण जाहीर, अनेक इच्छुकांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 04:52 PM2022-07-28T16:52:11+5:302022-07-28T17:11:38+5:30
कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ गणातील सदस्यांकरिता ही सोडत काढण्यात आली
कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया आज, गुरुवारी येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. अध्यासी अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ गणातील सदस्यांकरिता ही सोडत काढण्यात आली. यामध्ये ९ सदस्य हे महिला तर २ अनुसूचित जातीसाठी असून त्यापैकी एक अनुसुचित जातीतील महिलांसाठी राखीव असेल. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ४ गण आरक्षित झाले असून त्यापैकी २ महिलांसाठी आरक्षित तर सर्वसाधारण प्रवर्गातील १२ पैकी ६ महिलांसाठी राखीव गण अशी आरक्षण सोडत काढण्यात आली.
असे आहे नवीन आरक्षण !
कलमठ पंचायत समिती गण -अनुसूचित जाती महिला, सांगवे -अनुसूचित जाती, हरकुळ खुर्द व फोंडा - नागरिकांचा मागास प्रवर्ग , खारेपाटण व सावडाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लोरे, वारगाव, कासार्डे, नांदगाव, ओसरगाव व नाटळ - सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तर वरवडे, वागदे, तळेरे, जानवली, कळसूली व हरकुळ बुद्रुक - सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असणार आहेत.