कणकवलीत पावणेदोन लाखांची दारू जप्त, दोघा तरुणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:09 PM2019-05-06T17:09:57+5:302019-05-06T17:11:49+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूलसमोर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी लक्झरीमधून १ लाख ७५ हजार ५४० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या असलेले ५३ बॉक्स जप्त केले आहेत. तसेच गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघा तरुणांनाही अटक केली असून दारू वाहतुकीसाठी वापरलेली ३५ लाख रुपये किमतीची लक्झरीही जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूलसमोर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी लक्झरीमधून १ लाख ७५ हजार ५४० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या असलेले ५३ बॉक्स जप्त केले आहेत. तसेच गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघा तरुणांनाही अटक केली असून दारू वाहतुकीसाठी वापरलेली ३५ लाख रुपये किमतीची लक्झरीही जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
दरम्यान, कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करीत दारूसह लक्झरी बस असा ३६ लाख ७५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, हवालदार गुरुनाथ नाईक, विश्वास नारनवर, रवींद्र बाईत, राकेश चव्हाण आदींच्या पथकाने शनिवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूल येथे नाकाबंदी केली होती. महामार्गावरून जाणारी वाहने तपासत असताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास गोव्यावरून मुंबईला जाणारी आत्माराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस तिथे आली.
या लक्झरीचा चालक ज्ञानेश्वर दामोदर ताटकेरे (३६, रा. लांजा, रत्नागिरी) याच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना आहे का? अशी विचारणा पोलिसांनी केली. तसेच लक्झरीची डिकी उघडून दाखवायला सांगितले. डिकी उघडली असता त्यामध्ये काही पुठ्ठ्याचे बॉक्स आढळून आले. त्याबाबत पोलिसांना संशय आला.
त्यामुळे चालकाजवळ विचारणा केली असता त्याने लक्झरीतून प्रवास करणारे शिवलखन मोतीलाल केवट (२४) व रज्जन इंद्रलाल केवट (२०, दोन्ही राहणार मध्यप्रदेश) यांचे ते बॉक्स असल्याचे सांगितले. त्या दोघा तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता मुंबई -अंधेरी पूर्व येथील जिगर रब्जी पटेल याचे फिनेलचे कॅन त्या बॉक्समध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवा येथे आपल्याकडे ते दिले असून पाल्स रॉयल इन्व्हेंटर अँड प्रमोटर्स प्रा. लि. या कंपनीचे बिलही त्यांनी दाखविले.
मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ते बॉक्स उघडून पाहिले. त्या बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या बिअरच्या तसेच पांढऱ्या रंगाचे द्रावण असलेल्या बाटल्या व गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे त्या दोन्ही तरुणांना बिगरपरवाना गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी ताब्यात घेत लक्झरीसह सर्व माल जप्त करण्यात आला. अधिक चौकशी केल्यानंतर त्या दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात हवालदार विश्वास नारनवर यांनी तक्रार नोंदविली आहे. अधिक तपास पोलीस करीत असून गाडीच्या मालकासह त्या तरुणांकडे दारू देणाऱ्या व्यक्तीला संपर्क करून चौकशीसाठी कणकवलीत बोलविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.