सिंधुदुर्ग : नागवे येथील माळरानावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, रोख रक्कमेसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By सुधीर राणे | Published: May 26, 2023 02:10 PM2023-05-26T14:10:17+5:302023-05-26T14:11:05+5:30
जुगार खेळणाऱ्या बारा जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कणकवली(सिंधुदुर्ग): कणकवली तालुक्यातील नागवे येथील माळरानावर चाललेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अंधाराचा फायदा घेत जुगार खेळणारे काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर पळताना काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.या धाडीत जुगाराचे साहित्य, चार चाकी आणि दुचाकी गाड्यांसह,मोबाईल व इतर साहित्य असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर जुगार खेळणाऱ्या बारा जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कणकवली पोलिसांना नागवे माळरानावर जुगार अड्डा सूरु असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. यावेळी तिथे एलईडी बल्बच्या उजेडात सतरंजीवर बसून पत्यांच्या सहाय्याने जुगार खेळला जात होता. जुगार खेळण्यासाठी तिथे कणकवलीसह मालवण, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील व्यक्ती आल्या होत्या. त्यातील काहीजण पळून जाण्याचा यशस्वी झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांच्या या कारवाईत जयवंत आत्माराम बाईत, ( ४९, रा. कणकवली, तेलीआळी) सिध्देश भास्कर ठाकुर, ( ३९ , रा. कलमठ,लांजेवाडी)संतोष बाळकृष्ण कुडतरकर,( ५०, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ), विशाल वासुदेव सावंत ( ४५, रा. सावंतवाडी, वैश्यवाडा), केतन रावजी ढोलम,( ३५ , रा. कोळब आडारीवाडी, ता. मालवण), महेश गंगाधर जोगी ( ३२, रा. मालवण बाजारपेठ), कुलराज भगवान बांदेकर (२२, रा. मालवण, जोशीवाडी), शुभम कृष्णकांत मिठबावकर( २२, रा. मालवण हडी), रोहन जितेंद्र वाळके(२९ , रा. मालवण, देऊळवाडा), हेमराज प्रकाश सावजी ( ३०, रा. वायरी,भुतनाथ, ता. मालवण), विनायक शशिकांत शिर्के (रा. कलमठ, कणकवली), साहील उमेश आचरेकर (२१ ,मालवण,दांडी)यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी तक्रार नोंदविली आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक बापू खरात,विनायक चव्हाण, हवालदार पांडुरंग पांढरे, बारड,होमगार्ड राणे,गोसावी,सकपाळ, एकावडे आदी सहभागी झाले होते.
वाहनांसह २१लाख २१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त!
या धाडीत १ लाख ७ हजार रुपये किमतीचे मोबाईल,२४ हजार ३७०रुपये रोख रक्कम असा १ लाख ३१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर १९ लाख ९० हजार रुपये किमतीच्या तीन चार चाकी व तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. वाहनांसह या मुद्देमालाची एकूण किंमत २१लाख २१ हजार ३७० रुपये आहे.