कणकवलीत साडेचार लाखांची अवैध दारू जप्त
By admin | Published: November 9, 2015 10:52 PM2015-11-09T22:52:30+5:302015-11-09T23:26:06+5:30
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : एकास अटक, संशयित महिला फरार
बांदा, कणकवली : राज्य उत्पादन शुल्क खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गोवा बनावटीच्या दारुवर कारवाईचे सत्र सुरुच ठेवले असून सोमवारी उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील तुळशीदास रामचंद्र हुन्नरे यांच्या घरावर छापा टाकून १ लाख ५१ हजार २00 रुपये किमतीची तर त्यांच्या घराशेजारी असलेल्या गोडाऊनमधून २ लाख ९७ हजार ६00 रुपयांची अशी एकूण ४ लाख ४८ हजार ८00 रुपये किमतीची बेकायदा दारु जप्त केली. बेकायदा दारुचा साठा केल्याने तुळशीदास हुन्नरे (वय ५0) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
या मद्यसाठ्याबाबत प्राथमिक तपास केला असता सदरचा मद्यसाठा हा विलासिनी विलास हुन्नरे या संशयित महिलेचा असल्याचे समजले. त्यावरुन या संशयित महिलेचा शोध घेतला असता ही संशयित महिला या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यामुळे या संशयित महिलेला फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कणकवली शहरातील शिवाजीनगर येथे बेकायदा दारुचा साठा करुन ठेवण्यात आल्याची पक्की खबर उत्पादन शुल्क खात्याला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी चार वाजता ही कारवाई करण्यात आली. गेल्या आठ दिवसांतील अवैध दारु साठ्याविरोधातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.
प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरिक्षक शामराव पाटील, जवान जगन चव्हाण, दत्तप्रसाद कालेलकर, वैभव सोनावले, शिवशंकर मुपडे, मिलिंद माळी, मलिक धोत्रे, मयुरी चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. घरात बेकायदा दारुचा साठा केल्याची माहिती मिळाल्याने दारुबंदी कायद्यांतर्गत छापा टाकला असता घरात १ लाख ५१ हजार २00 रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या मद्याचे १९ बॉक्स आढळले. तसेच घराच्या लगत असलेल्या गोडाऊनमध्ये २ लाख ९७ हजार ६00 रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या मद्याचे ४१ बॉक्स आढळले. अधिक तपास प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे करीत
आहेत. (प्रतिनिधी)