सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे!
By सुधीर राणे | Published: October 28, 2022 01:52 PM2022-10-28T13:52:03+5:302022-10-28T13:52:47+5:30
अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी
कणकवली : शासनाने अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणीची नोंद करण्याच्या सूचना दिल्यानुसार महसूल विभागाने केलेल्या प्रयत्नांनंतर निर्धारित मुदतीत ७८ हजार ९९३ खातेदारांच्या नोंदी झाल्या आहेत. यात कणकवली तालुक्याने सर्वाधिक म्हणजे १२, ५१० नोंदी केल्या आहेत. आता उर्वरित खरिपाच्या पीक पाहणीच्या नोंदी तलाठ्यांमार्फत होणार आहेत. तर रब्बी व इतर बहुवार्षिक पिकांबाबतच्या नोंदी ॲपच्या माध्यमातून करता येणार आहेत.
ई - पीक पाहणीची नोंद ॲपच्या माध्यमातून करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. त्यानुसार कणकवली –१२५१०, कुडाळ -१०८६८, देवगड- १०७३८, दोडामार्ग- ५२५१, मालवण -११४८३, वेंगुर्ले- १० ९९५, वैभववाडी -६७९६ व सावंतवाडी - १०३५२ अशा एकूण ७८,९९३ नोंदी अॅपच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्गमध्ये २ लाख ७२ हजार ९५३ खातेदार आहेत. यापैकी ७८ हजार ९९३ खातेदारांच्या नोंदी ॲपच्या माध्यमातून झालेल्या असल्या, तरीही अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी आहेत. या नोंदी तलाठ्यांच्या माध्यमातून करण्यास परवानगी मिळाली असून तशा पद्धतीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मात्र, रब्बी व बहुवार्षिक पिकांबाबत अद्यापही अॅपच्या माध्यमातून नोंदी करणे शक्य आहे. मात्र, ॲपच्या माध्यमातून नोंदी करण्यास आलेल्या अडचणी, सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्या, महसूल विभागाला इतर कामे सोडून याचसाठी करावी लागणारी धडपड याचा विचार करता, याही नोंदी तलाठ्यांच्या माध्यमातूनच पूर्ण कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.