कणकवली-वागदेत उद्या अवतरणार प्रतिशिर्डी, संदेश पारकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 04:34 PM2018-02-01T16:34:55+5:302018-02-01T16:35:06+5:30
साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून वागदे मैदान येथे २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी सबका मालिक एक है हे महानाट्य साकारणार आहे.
कणकवली : साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून वागदे मैदान येथे २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी सबका मालिक एक है हे महानाट्य साकारणार आहे. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता या महानाट्याला प्रारंभ होणार आहे. वागदे येथे २ फेब्रुवारीला प्रतिशिर्डी अवतरणार आहे, अशी माहिती भाजप नेते संदेश पारकर यांनी वागदे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संदेश पारकर पुढे म्हणाले, या महानाट्यातून साईबाबांचे विचार, साईबाबांची शिकवण, श्रद्धा, सबुरी कळणार आहे.
जीवनाला दिशा देणारे हे महानाट्य असून आनंदी जीवन कसे जगावे याची शिकवण या महानाट्यातून मिळणार आहे. या महानाट्यात २५० कलाकार असून ५० स्थानिक कलाकारांनी भाग घेतला आहे. महानाट्यात सार्इंच्या जीवनावरील अनेक प्रसंग, सार्इंचा जन्मोत्सव, त्यांचा पोशाख, सार्इंची दिवाळी, विद्युत रोषणाई, कलाकारांचे आवाज, साई पारायण यांसह साईबाबांचे अद्भुत चमत्कार पाहायला मिळणार आहेत.
या महानाट्यातून आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील फार मोठी उत्सुकता पाहायला मिळणार आहे. महानाट्याच्या निमित्ताने सार्इंचा दरबार भरलेला पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्गची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांमध्ये सार्इंविषयी आत्मीयता यावी यासाठी विद्यार्थ्यांना कमी शुल्क ठेवण्यात आले आहे. शिवाय बचतगटासाठी सवलतीच्या दरात हे महानाट्य पहायला मिळणार आहे. जे विद्यार्थी हे महानाट्य पाहतील, त्यांना बेसिक कॉम्प्युटर, इंग्लिश स्पिकिंग कोर्स हे माफक दरात शिकविले जाणार आहेत. महानाट्याच्या निमित्ताने वागदे येथे साईनामाचा गजर दुमदुमणार आहे.
या महानाट्याच्या शुभारंभाला २ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दत्ताजी लाड, आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अभिनेते, अभिनेत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोडामार्ग, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड आदी लांबच्या तालुक्यातील भाविकांसाठी एसटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांनी एसटी आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन संदेश पारकर यांनी केले. १ हजार चौरस फुटावर स्टेज व्यवस्था, आसन व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री १० वाजता सार्इंची आरती होऊन या महानाट्याची सांगता होणार आहे.
या महानाट्यात ५०० फोकस, साऊंड सिस्टीम, द्वारकामाई, गंगादर्शन, स्वामी समर्थ दर्शन, विठ्ठल दर्शन, फटाक्यांची आतषबाजी, बैलगाडी, घोडागाडी, खंडोबाचे मंदिर आदींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविक भारावून जातील, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संदेश पारकर यांनी दिली. पार्किंग व्यवस्था, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षक यांचीही चोख व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोकणरत्न पुरस्काराने होणार सन्मान
२ फेब्रुवारीला शुभारंभाप्रसंगी कला, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºयांना कोकणरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तिकीट विक्री सुरू आहे त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असे संदेश पारकर म्हणाले. या महानाट्याचा जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानाट्याचे प्रमुख आयोजक संदेश पारकर यांनी केले आहे.