कणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:55 PM2020-09-26T17:55:47+5:302020-09-26T17:58:21+5:30
कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिक सेवा बजावण्यासाठी बाहेर पडल्याने काहीशी वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याचे चित्र आहे.
कणकवली : कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिक सेवा बजावण्यासाठी बाहेर पडल्याने काहीशी वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याचे चित्र आहे.
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक संघटना व नागरिकांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यामुळे कणकवली शहरातील नेहमीच गजबलेली बाजारपेठ ठप्प झाली आहे. कणकवली शहरात सरासरी २० ते २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. परंतु सध्या ही कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या दोन दिवसांपासून कमी होताना दिसत आहे.
तालुक्यातील आकडेवारीतही काहीशी घट झाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी या जनता कर्फ्यू मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. तसेच सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या नेत्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हा बंद यशस्वी झाला आहे.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्यूत सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत सर्व स्तरातील नागरीकांनी पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे २० सप्टेंबर पासून आतापर्यंत कणकवली शहरात जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी मेडिकले, दवाखाने सुरू
कलमठ, जानवली, हळवल, वागदे, तळेरे, खारेपाटणसह कणकवलीमध्ये जनता कर्फ्यू आहे. या ठिकाणी बाजारपेठ बंद आहे. दूध व पेपर विक्री सकाळी ९ वाजेपर्यंत केली जाते. तर अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी मेडिकल व खासगी दवाखाने चालू ठेवण्यात आले आहेत.
काही अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एसटी सेवा, बँका, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालये चालू आहेत. मात्र त्या ठिकाणी शुकशुकाट आहे. सोमवारपासून हे वातावरण पुन्हा सुरळीत होईल. त्याची वाट नागरिकांकडून पाहिली जात आहे.