पालकमंत्र्यांची ग्वाही : कणकवलीला लॉकडाऊनमध्ये मिळणार सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 06:06 PM2021-05-10T18:06:32+5:302021-05-10T18:08:24+5:30
CoroaVirus Sindhudurg : सिंधुदुर्गसाठी एकाचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने त्यापूर्वी ८ दिवसांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता सवलत म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांना दिली.
कणकवली : सिंधुदुर्गसाठी एकाचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने त्यापूर्वी ८ दिवसांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता सवलत म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांना दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन होणार ही माहिती समजल्यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने शनिवारी बैठक घेत विरोधी नगरसेवक व व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी कणकवलीला या लॉकडाऊनमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे, विरोधी नगरसेवक आणि व्यापाऱ्यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क करून केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सवलत देण्याचे मान्य केले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा पदाधिकारी महेश नार्वेकर, राजू गवाणकर, राजेश पारकर, सुशील पारकर, राजेश राजाध्यक्ष, शेखर गणपत्ये, विशाल कामत आदी उपस्थित होते.
या बैठकीत राजेश राजाध्यक्ष यांनी नगरपंचायतीमार्फत आवाहन केल्यानंतर जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झालो. आता प्रशासनाचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने जर लॉकडाऊन जाहीर केले व त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारमार्फत जाहीर झाले तर व्यापाऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न विचारला. या संदर्भात पालकमंत्री व सर्व आमदारांशी व्यापारी संघटनेने चर्चा करावी, अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली. त्यानुसार आमदारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
निर्णयावर एकमत
१३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हा. १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले व तसा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांना कळविण्यात आला.