कणकवलीत तरुणावर चाकूने हल्ला ; हल्लेखोर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 06:49 PM2021-07-20T18:49:18+5:302021-07-20T18:50:40+5:30
Crimenews Sindhudurg : बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली.
कणकवली : बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. त्या तरुणाच्या पोटात चाकूने वार करण्याचा प्रयत्न हल्लेखोर करीत असतानाच प्रसंगावधान राखल्याने तो बालंबाल बचावला आहे. मात्र, त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणाचे नाव उत्तम चंद्रकांत पुजारे (३३)असे आहे.
या घटनेनंतर तेथील लोकांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोराने पलायन केले. तसेच जखमी उत्तम पुजारे याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलिस ठाण्यामध्ये सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून उपलब्ध माहितीनुसार उत्तम पुजारे हा बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेचा चालक म्हणून काम करतो. हरकुळ बुद्रुक येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हरकुळ बुद्रुक येथील संशयित आरोपीने पुजारे यांच्या घराजवळ जात मंगळवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला केला.
मात्र,सुदैवाने या हल्ल्यात पुजारे बालंबाल बचावला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भरदिवसा कणकवली शहरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.