मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला कणकवलीकरांचा पाठिंबा; कँडल मार्च काढून घोषणाबाजी
By सुधीर राणे | Published: November 1, 2023 11:47 AM2023-11-01T11:47:11+5:302023-11-01T11:47:29+5:30
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले
कणकवली: बदलत्या काळानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मिळविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मंगळवारी कणकवली येथील मराठा समाजाच्या कॅण्डल मार्चच्यावेळी सकल मराठा समाजाने केला.
मराठा समाजाचे नेते म्हणून मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कणकवली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पुढील कालावधीत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
मराठवाड्यात आरक्षणासाठीची आग धगधगत आहे. तिचे पडसाद हळूहळू सिंधुदुर्गात उमटू लागले आहेत. कणकवली शहरामध्ये मराठा समाजाच्यावतीने मेणबत्ती पेटवून आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आरक्षणाला तीव्र विरोध करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. मात्र, पोलिसांनी तत्काळ पुतळा बाजूला हठविला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्ते हळूहळू जमा होत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे नेते एस.टी.सावंत, लवू वारंग, एस.एल. सपकाळ, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,महेंद्र सांबरेकर, संदीप राणे, गणेश काटकर, सुशांत नाईक, अनंत राणे, डॉ. तुळशीराम रावराणे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आंदोलनाच्या पुढील दिशेबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.