कणकवलीचे भूषण 'संतांचा गणपती '!, मातीच्या एकवीस गोळ्यांपासून निर्मिती; प्रसाद म्हणून दिली जाते 'भांग'

By सुधीर राणे | Published: September 5, 2022 04:54 PM2022-09-05T16:54:11+5:302022-09-05T16:54:40+5:30

मातीच्या एकवीस गोळ्यांपासून गणेश मूर्तीची निर्मिती

Kankavali's Bhushan Ganpati of Saints, immersion will be held on the seventh day this year | कणकवलीचे भूषण 'संतांचा गणपती '!, मातीच्या एकवीस गोळ्यांपासून निर्मिती; प्रसाद म्हणून दिली जाते 'भांग'

कणकवलीचे भूषण 'संतांचा गणपती '!, मातीच्या एकवीस गोळ्यांपासून निर्मिती; प्रसाद म्हणून दिली जाते 'भांग'

Next

कणकवली :  कणकवली टेंबवाड़ी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला 'संतांचा गणपती ' वैशिष्टयपूर्ण असाच आहे. कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाची गणेश चतुर्थी दिवशी विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच जणू भक्तिरसाने भारावून जाते.

गणेशोत्सवात अनेक घरात गणरायाचे पूजन केले जात असले तरी संतांच्या या गणपती कडील वातावरण तसेच तेथे दर्शनासाठी उपस्थित असलेल्या भाविकांचा उत्साह पाहिला की या घरगुती गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवासारखे स्वरूप आल्याचे आपल्या लक्षात येते. संत पायाजी सावंत यांचे नातू जगन्नाथ महादेव सावंत यांच्या कुटुंबियांबरोबरच कणकवली शहरातील अनेक भाविक तसेच नागेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते कणकवलीचे भूषण असलेल्या या गणरायाची अनंत चतुर्दशीपर्यंत आपापल्या परीने सेवा करीत असतात. मात्र, यावर्षी सात दिवसांनी गणरायाला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मातीच्या एकवीस गोळ्यांपासून गणेश मूर्तीची निर्मिती

'संतांच्या ' या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे मातीच्या एकवीस गोळ्यांपासून दरवर्षी या गणेश मूर्तीची निर्मिती केली जाते. कणकवली टेंबवाड़ीतील बाल गोपाळ मंडळी आपल्या कला नैपूण्यातून ही मूर्ती बनवितात. सुमारे सहा फुट उंच असलेली व उंदरावर विराजमान झालेली ही गणेश मूर्ती अत्यंत सुबक दिसते. संतांच्या या गणपतीच्या संपूर्ण शरीराला लाल रंग असतो. त्याच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तिकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात. तसेच मूर्ती जागृत व्हायला मदत होते. असे या गणपतीच्या रंगाबद्दल सांगितले जाते. संपूर्ण शरीराला लाल रंग, पिवळे पीतांबर परिधान केलेली, डोक्यावर सोनेरी मुकुट धारण केलेली व कानावर पोपट धारण केलेली अशी संतांच्या गणपतीची मूर्ती बनविलेली असते.

ही मूर्ती घरीच म्हणजे टेंबवाड़ी येथील सावंत कुटुंबियांच्या श्री गणेश मंदिरात बनविली जाते. येथील गणेशोत्सवात अनेक धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अनंत चतूर्दशीच्या आदल्या दिवशी किंवा विसर्जन करण्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण रात्र हरिनामाने रंगून निघते. रात्रभर विविध भजनी मंडळे भजनामध्ये तर कणकवली शहरातील काही मंडळे श्रींच्या आरती मध्ये दंग झालेली येथे पहावयास मिळतात.   
 
प्रसाद म्हणून दिली जाते 'भांग'

श्री गणपतीचा प्रसाद म्हणून 'भांग' दिली जाते. जिला 'सब्जी' असेही संबोधले जाते. तर त्याच्या जोड़ीला करंजीही भाविकांना देण्यात येते.  संतांच्या गणपतीची पूर्वपीठिका! सावंतवाड़ी तालुक्यातील कुणकेरी गावातील मूळ रहिवासी असलेले संत पायाजी बाळाजी सावंत विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पायी चालत पंढरीची वारी करण्यात त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. ज्यावेळी ते पंढरपुरला पायी जात असत त्यावेळी कणकवली बसस्थानका शेजारील सोनगेवाडी येथे त्यांचा मुक्काम असे. संत पायाजी सावंत यांची तेथे कीर्तने तसेच प्रवचने होत असत. कणकवलीतील राणे (पटेल) तसेच इतर गावकरी मंडळीनी त्यांना टेंबवाड़ी येथे निवास करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देवून संत पायाजी सावंत यांनी टेंबवाड़ी येथे वास्तव्य केले. त्यानंतर प.पू.साटम महाराज यांच्या सांगण्यावरून संत पायाजी सावंत यांनी टेंबवाड़ी येथे गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून संतांचा गणपती अशी त्याची सर्वत्र ख्याती झाली.   

Web Title: Kankavali's Bhushan Ganpati of Saints, immersion will be held on the seventh day this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.