कणकवलीत उद्या होणार नाट्यगान निपुण कला
By admin | Published: January 1, 2016 10:35 PM2016-01-01T22:35:17+5:302016-01-02T08:29:28+5:30
अरविंद पिळगावकर : पन्नास वर्षांच्या अनुभवांचा आलेख उघडणार
कणकवली : ज्येष्ठ रंगभूमी कलाकार आणि गायक अरविंद पिळगावकर यांचा गेल्या ५० वर्षातील अनुभवावर आधारीत ‘नाट्यगान निपुण कला’ हा साभिनय नाट्यसंगीताचा कार्यक्रम जानवली येथील वृंदावन हॉलमध्ये होणार आहे. दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ आॅक्टोबर १९३७ रोजी झाला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी बी. ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. पद्मश्री दाजी भाटवडेकर यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. तर पं. के. डी. जावकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. गोविंद अग्निहोत्री हे त्यांचे गायनातील गुरू होते.
१९६४ साली मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘यशवंतराव होळकर’ या ऐतिहासिक नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. १९६७ साली ‘संगीत वासवदत्ता’ या नाटकात त्यांनी नायक उदयनची भूमिका केली. या नाटकात सुहासिनी मूळगावकर या नायिकेच्या भूमिकेत होत्या. त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘जय जगदीश हर’, ‘पंढरपूर’, ‘धाडीला राम तिने का वनी’ इत्यादी नाटकांतून भूमिका केल्या. तसेच ‘सौभद्र’, ‘रामराज्य वियोग’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ आदी अभिजात संगीत नाटकात प्रमुख व चरित्र अभिनेत्याच्या विविध भूमिका पिळगावकर यांनी केल्या.
‘संगीत कान्होपात्रा’, ‘संत नामदेव’, ‘सोन्याची द्वारका’, ‘भाव तोचि देव’ इत्यादी नाटकांतून भक्तीरसपूर्ण भूमिका केल्या. ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘विठो-रखूमाय’, ‘दशावतारी राजा’ अशा लोककलांवर आधारीत नाटकांतून त्यांनी भूमिका
साकारल्या.
नानासो फाटक पुरस्कृत गणपतराव जोशी सुवर्णपदक, नाट्य परिषद पुरस्कृत बालगंधर्व पारितोषिक, केशवराव भोसले पुरस्कार, पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्कार, अशोक सराफ पुरस्कृत गोपीनाथ सावकार पुरस्कार (बोरिवली शाखा), प्रदीर्घ नाट्यसेवा गौरव (पुणे शाखा), तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणेचा पं. जितेंद्र अभिषेकी जीवनगौरव पुरस्कार, गणपती न्यास (फडकेवाडी) गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार (सांगली), दीनानाथ मंगेशकर रंग पुरस्कार (गोवा), महाराष्ट्र शासनाचा आण्णासो किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार यांनी पिळगावकर यांना गौरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमातून पिळगावकर हे त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनाचा प्रवास साभिनय उलगडणार आहेत. (प्रतिनिधी)
साभिनय नाट्यसंगीताचा कार्यक्रम.
कणकवलीतील जानवली येथे होणार कार्यक्रम.
पिळगावकर विविध पुरस्कारांनी सन्मानित.
विविध नाटकांमधून केली कामे.
दाजी भाटवडेकर यांच्याकडे अभिनयाचे धडे.