कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके यांचा राजीनामा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 02:22 PM2020-12-05T14:22:14+5:302020-12-05T14:24:32+5:30
Kankvali, Bjp, sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशतचा नारा देत भाजपाची वाटचाल सुरू आहे. मात्र,असे असताना भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते राजन चिके यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे .
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशतचा नारा देत भाजपाची वाटचाल सुरू आहे. मात्र,असे असताना भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते राजन चिके यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे .
वैयक्तिक कारणामुळे तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . मात्र , त्यांच्या अचानक राजीनामा देण्याच्या कृतीबाबत आता उलट - सुलट चर्चा कणकवली तालुक्यात सुरू झाली आहे .
अलीकडेच कणकवलीत माजी राज्यमंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांचा दौरा झाला . त्यानंतर राजन चिके यांच्या राजीनाम्याबाबत घडामोडी घडल्याचे बोलले जात आहे . भाजपाचे बेळणे येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले . त्यानंतर राजन चिके यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला . त्यामुळे या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण आहे की अन्य काही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .
राजन चिके हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत . कठीण काळातही त्यांनी भाजपा वाढीसाठी प्रयत्न केले आहेत . फोंडाघाटमध्ये भाजपाचा बालेकिल्ला राखण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे . चिके यांची फोंडाघाट परिसरात एक व्होट बँक असल्याचे मानले जाते . फोंडाघाट सोसायटी ताब्यात ठेवण्यामध्ये ही त्यांचा मोलाचा वाटा आहे . अशा स्थितीत त्यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्काना ऊत आला आहे .
कणकवली तालुका भाजपचे दोन मंडळाचे दोन तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते . त्यात फोंडाघाट , नाटळ , हरकुळ आणि कणकवली शहर या मंडळासाठी राजन चिके तर उर्वरित भागासाठी संतोष कानडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती .
पक्ष श्रेष्ठी राजीनामा स्वीकारणार का ?
भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या राजन चिके यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठी स्वीकारणार का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच पक्षाने राजीनामा स्वीकारल्यास तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ? याबाबत कणकवली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.