मुंबईतील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन उघड, मुंबई पोलिसांनी कणकवलीतून घेतले एकास ताब्यात 

By सुधीर राणे | Published: October 5, 2023 11:43 AM2023-10-05T11:43:36+5:302023-10-05T11:44:02+5:30

कणकवली: अमली पदार्थांची विक्री करणारा संशयित शौनक सुरेश बागवे (वय -२८, रा. कणकवली) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने ...

Kankavli connection of charas sale in Mumbai exposed, Mumbai police arrested one from Kankavli | मुंबईतील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन उघड, मुंबई पोलिसांनी कणकवलीतून घेतले एकास ताब्यात 

मुंबईतील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन उघड, मुंबई पोलिसांनी कणकवलीतून घेतले एकास ताब्यात 

googlenewsNext

कणकवली: अमली पदार्थांची विक्री करणारा संशयित शौनक सुरेश बागवे (वय -२८, रा. कणकवली) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत मोबाईल लोकेशनद्वारे ताब्यात घेतले. ही कारवाई कणकवली येथे बुधवारी रात्री करण्यात आली. त्यामुळे मुंबई येथील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. 

दरम्यान, कणकवली पोलिस ठाण्यात शौनक बागवे याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याला मुंबई येथे नेण्यात आले. या कारवाईमध्ये कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार रवींद्र बाईत, पांडुरंग पांढरे आदी सहभागी झाले होते.

मुंबई येथील आझाद मैदान पोलिस स्थानकात ९ सप्टेंबर २०२३ रोजी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती या प्रकरणात अन्य संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. यातील शौनक बागवे हा संशयित कणकवलीत असल्याचे लोकेशन मुंबई पोलिसांना मिळत होते. त्यानुसार मुंबई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस पथक बुधवारी कणकवलीत दाखल झाले. 

त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिसांच्या मदतीने शौनक याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो राहत असलेल्या आचरा महामार्गलगत असलेल्या एका कॉम्पलेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुमच्या ठिकाणी ते गेले असता शौनक तेथे नव्हता. मात्र, त्याचे वडील तिथे होते. पोलिसांनी त्यांच्याजवळ शौनक कुठे आहे, याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी शौनकला पडकण्यासाठी सापळा रचला. 

रात्री ८.३० वाजता शहरातील एका हॉटेलमधून तो बाहेर पडला. तो आपल्या राहत्या ठिकाणी पोहोचत असतानाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शौनक यापूर्वी मुंबईत अमली पदार्थांची विक्री करत होता. सध्या तो आचरा महामार्गालगत असलेल्या एका कॉम्पलेक्स राहत होता. या कारवाईमुळे कणकवलीतही अमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखीन काही आरोपींचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Kankavli connection of charas sale in Mumbai exposed, Mumbai police arrested one from Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.