....तोपर्यंत काम करू देणार नाही!, नगराध्यक्षांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
By सुधीर राणे | Published: December 9, 2022 04:21 PM2022-12-09T16:21:49+5:302022-12-09T16:22:20+5:30
'महामार्ग प्राधिकरण निव्वळ कामापुरते गोड बोलून कामे उरकण्याच्या मार्गावर'
कणकवली : कणकवलीतील महामार्ग उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्सेल ब्रिजच्या सर्विस रस्त्याच्या लगतच्या भिंती हटवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत नगरपंचायतकडे सहकार्य मागण्या करता गेलेल्या महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी अपूर्ण कामावरून खडेबोल सुनावले.
तसेच कणकवली शहरवासीयांची अनेक कामे प्रलंबित असताना केवळ ठेकेदाराच्या सोयी करता बॉक्सेल ब्रिजची भिंत हटवून त्या ठिकाणी काँक्रीट प्लेट लावून तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. नगरपंचायतीची जुनी पाईपलाईन अनेकदा फोडून ती सर्विस रस्त्याखाली घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांना पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत आहे.
नव्याने पाईपलाईन घालून देण्याबाबत आश्वासन देऊन देखील ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. वारंवार सूचना केल्या तरी त्याची दुरुस्ती केली जात नाही. जोपर्यंत जनतेच्या सोयीची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बॉक्सेल ब्रिजचे काम सुरू करू देणार नाही असा इशारा समीर नलावडे यांनी दिला.
कणकवली नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष दालनात महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता साळुंखे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान नगराध्यक्षांनी आजपर्यंत फक्त ठेकेदार कंपनी व तुम्ही आश्वासने देत आलात. मात्र,ती पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम सुरू करायचे नाही असे सुनावले.
महामार्ग प्राधिकरण निव्वळ कामापुरते गोड बोलून कामे उरकण्याच्या मार्गावर आहे. परंतु आता तुमची आश्वासने ऐकून घेणार नाही. अगोदर शहरवासीयांची कामे पुरी करा व नंतरच बॉक्सेलचे पाडकाम सुरु करा अशी भूमिका नगराध्यक्ष नलावडे यांनी घेतली. तसेच याबाबत आमदार नितेश राणे यांच्याकडे देखील तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.