कणकवलीचे आमदार अनेक मु्द्यांवर अपयशी ठरले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:16 PM2019-05-16T12:16:32+5:302019-05-16T12:17:34+5:30
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघात अनेक मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे काम संदेश पारकर करत आहेत. जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी ...
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघात अनेक मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे काम संदेश पारकर करत आहेत. जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे . केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित निधी देणारे सरकार असताना कणकवली मतदारसंघातील स्थानिक आमदारांनी योग्य पाठपुरावा न केल्यामुळे अनेक प्रश्न ते मार्गी लावू शकले नाहीत. अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली .
कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संदेश सावंत -पटेल, महेश सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प लोकांना नको असेल तर आमचाही विरोध असेल . परंतु प्रकल्प समन्वय समितीच्यावतीने दहा हजार एकर जमीन असलेल्या शेतकर्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट तेवीस मे नंतर घेणार आहे. नाणार प्रकल्पला तेरा हजार एकर जमीन लागणार आहे . त्यामुळे दहा हजार एकर जमीन मिळाल्यास 70 टक्के जमीन शासनाकडे भूसंपादित होईल. त्यामुळे दीड लाख बेरोजगारांना नोकऱ्या देणारा हा प्रकल्प जनतेने स्वीकारल्यास कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होईल. असा विश्वास प्रमोद जठार यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत शासन सकारात्मक आहे . मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले आहे की, पहिल्यांदा प्रकल्प उभारणारी कंपनी निश्चित करा . कारण त्या कंपनीला अपेक्षित असलेले प्रश्न मार्गी लावता येथील . प्रकल्पासाठी जागा निश्चिती संबंधित कंपनी करेल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया शासन करेल. केवळ शासनाने जमीन भूसंपादन करून घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करू नये . त्या भूमिकेला माझा विरोध राहील. या गोष्टीचा विचार करता मालवण वायंगणी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाची जमीन अशास्त्रीय पद्धतीने ठरविण्यात आल्याची टीका प्रमोद जठार यांनी यावेळी केली.
२३ मेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे देशात तीनशेपेक्षा अधिक खासदार निवडून येणार आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी सरकार येणार आहे. २२ मे पर्यंत विरोधक आमच्या विरोधात बोलत राहतील. मात्र , २३ मे रोजी त्यांची बोलती बंद होईल . रत्नागिरी मतदार संघातही युतीचाच खासदार मोठ्या मताधिक्याने जिंकेल.
मुंबईत काही प्रचार सभा मी घेतल्या होत्या . राज ठाकरेंनी मोदी सरकारला केलेल्या विरोधामुळे त्याचा फायदा युतीच्या उमेदवारांनाच होईल . मुळात मनसेने एवढा विरोध करून उमेदवार उभे न केल्यामुळे त्याचा लाभ शिवसेना -भाजपच्या उमेदवारांना होणार आहे .त्यामुळे राज्यात युतीचे ४० पेक्षा जास्त खासदार विजयी होतील. राज ठाकरेंच्या कृतीचा फायदा युतीला होऊन आम्ही चांगल्या जागा जिंकू . असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
राणेंनी स्वतः च्या स्वार्था पलीकडे काय केले ?
राणे कुटुंबीयांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. सत्तेत राहून भाजपकडून खासदारकी मिळवली. तर स्थानिकांचे प्रश्न न सोडवता जनतेची दिशाभूल करण्याचेच काम आमदार नितेश राणे करत आहेत. कृषी पंप कंनेक्शन प्रलंबित आहेत. महामार्गाचा मोबदला न देता भूसंपादन प्रक्रिया केली जात आहे . कणकवली शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. वाहतूक कोंडीने सर्वसामान्य हैराण झाले आहेत . आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे . मग केवळ आमदारकी काय उपयोगाची ? नारायण राणे यांच्याकडूनही दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर पहिल्यांदा त्यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच जनतेच्या प्रश्नासाठी भाजपाच्या वरिष्ठांकडे किंवा शासनाकडे आवाज उठवावा . त्यासाठी भाजप विरोधाची आणि सत्ता सोडण्याची भूमिका घ्यावी . असा टोला समीर नलावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदेश पारकर यांनी लगावला.
ते म्हणाले, माझ्याशी गाठ आहे.असे सांगून प्रश्न मिटणार नाहीत. गल्लीतले प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत वजन वापरण्याची गरज आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची भूमिका राणे यांनी घ्यावी . जनतेची चेष्टा केलेली आम्ही सहन करणार नाही . महामार्ग संबधित प्रश्न न सुटल्यास पूर्ण काम बंद पाडू. असा इशाराही संदेश पारकर यांनी यावेळी दिला.