सिंधुदुर्ग : कणकवली मनसेचे घ्ंटानाद आंदोलन, प्रांताधिकाऱ्याना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:54 PM2018-10-30T16:54:50+5:302018-10-30T17:03:25+5:30
भाजप शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्या या शासनाने सर्वच घटकांतील लोकांसाठी बुरे दिन आणले आहेत.असा आरोप करीत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी मनसेच्यावतीने मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.
कणकवली: भाजप शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्या या शासनाने सर्वच घटकांतील लोकांसाठी बुरे दिन आणले आहेत.असा आरोप करीत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी मनसेच्यावतीने मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.
घ्ंटानाद आंदोलन केल्यानंतर प्रांताधिकारी निता शिंदे- सावंत यांच्याकडे मुख्यमंत्र्याना देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे , मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, संतोष कुडाळकर, गुरु भालेकर, शरद सावंत, अरविंद घाडीगावकर , प्रभाकर राणे आदी मनसैनिक उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मुख्यमंत्री तसेच भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी प्रचार सभेमधून व आपल्या जाहिरनाम्यातून जनतेला विकासाची स्वप्ने दाखविली होती. मात्र, गेल्या चार वर्षात महागाईचा डोंगर दिवसेदीवस वाढत चालला आहे. पण रोजगार देणारा एकही उद्योग हे शासन निर्माण करू शकलेले नाही. नोटबंदीनंतर तर हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरीही देशोधडीला लागले आहेत. या धक्क्यातून सर्वसामान्य जनता अजूनही सावरलेली नाही. आता पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे तर सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
शासन मान्य रास्त दराची दुकाने बंद होण्याच्या स्थितीत आहेत. निराधार पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकारांचीही पेन्शन थकली आहे. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कामगार आणि अधिकारी देखील शासना विरोधात आंदोलन करीत आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याना आंदोलने करावी लागत आहेत. हे निषेधार्ह आहे.
अनेक अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात आहे. या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. जिल्ह्याबरोबरच संपूर्ण देशातच खून , दरोडे, बलात्कार अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. जनता अगदी मेटाकुटिस आली आहे.
सिंधुदर्ग जिल्ह्यात रस्ते खड़ेमय बनले आहेत. धरणांची कामे ठप्प झाली आहेत. शासकीय आरोग्य सेवा जनतेला व्यवस्थित रीत्या न मिळाल्याने काही खासगी डॉक्टरांकडून जनतेची लूट होत आहे. अशा स्थितीत जनतेच्या भावना शासना पर्यन्त पोहचविण्यासाठी तसेच शासनाला जाग आणण्यासाठी हे घ्ंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
कड़क पोलिस बंदोबस्त !
मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सोमवारी जाहिर केल्याप्रमाणे घन्टानाद आंदोलन मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, हवालदार तावड़े यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.